Nashik Crime : कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्याकडे सापडले तब्बल ५३ डेबिट कार्ड

nashik crime,www.pudhari.news
nashik crime,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

वेगवेगळे एटीएम कार्ड बदली करून हातचलाखी करत अनेकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आडगाव गुन्हे शोध पथकाला यश आले असून, या संशयिताकडून वेगवेगळ्या बँकांचे व वेगवेगळ्या नावांचे ५३ एटीएम कार्ड, बटनचा लहान रामपुरी चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथील दिनेशकुमार राजपत मिश्रा हे दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी जत्रा हॉटेलसमोरील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये कार्डचे पिन जनरेट व बॅलन्स चेक करण्यासाठी गेले होते. त्यांना मदत करण्याचा बहाण्याने एकाने त्यांचा एटीएम पिन पाहून घेतला आणि हातचलाखीने एटीएम बदली करून घेतले. दिनेशकुमार यांच्या खात्यातून एटीएमच्या साहाय्याने 24 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्याहादे व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी एकजण संशयास्पदरीत्या मास्क लावून रांगेत उभा असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी संशयित संतोष हरिश्चंद्र मोहिते (३०, रा. सह्याद्रीनगर, दत्त मंदिर, जुन्या गणपती मंदिराजवळ, उल्हासनगर, जि. ठाणे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अंगझडती घेतली असता त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे व वेगवेगळ्या नावांचे ५३ एटीएम कार्ड व बटनचा लहान रामपुरी चाकू हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपआयुक्त साो, परिमंडळ एकचे किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्याहदे, पोलिस उपनिरीक्षक अरुण पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र शिंदे, पोलिस हवालदार सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, ज्ञानेश्वर कहांडळ, पोलिस नाईक नीलेश काटकर, दादासाहेब वाघ, अरुण अहिरे, गणेश देसले व पोलिस अंमलदार निखिल वाघचौरे, अमोल देशमुख, सचिन बाहीकर, विलास चारोस्कर यांनी पार पाडली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news