केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र हिसकावले

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
परिसरात गुन्हेगारीने कळस गाठला असून, महिलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यात आता चक्क केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मातोश्रींचेच मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली आहे.
ना. डॉ. पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागूल पेठ रोडवरील आरटीओ परिसरातील भाजीबाजारात भाजीपाला खरेदी करून त्या घराकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांच्याजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बागूल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले आणि क्षणार्धात पसार झाले. आसपास कुणी नसल्याने बागूल यांना काहीच करता आले नाही. अडीच ते तीन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. या सर्व प्रकारानंतर बागूल यांनी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहे.
सुप्रिया सुळेंची जोरदार टीका
नाशिकच्या या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ना. डॉ. पवार यांच्या आईंच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. देव त्यांना निरोगी, दीर्घायुष्य देवो. परंतु या घटनेमुळे मंत्र्यांचे नातेवाईकही सुरक्षित नाहीत हे उघड झाले आहे. त्यांची ही स्थिती तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, कृपया कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी.
हेही वाचा :