नाशिक : "नमामि गोदा' प्रकल्पाचा आराखडा आठवडाभरात | पुढारी

नाशिक : "नमामि गोदा' प्रकल्पाचा आराखडा आठवडाभरात

नाशिक : नमामि गंगेच्या धर्तीवर नाशकात गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी साकारण्यात येणाऱ्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा सल्लागाराकडून येत्या आठवडाभरात सादर केला जाणार आहे. या आराखड्याची तपासणी केल्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडून महिनाअखेरीस केंद्राला सादर केला जाणार आहे.

२०१७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जवळपास १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. ‘नमामि गोदा’ प्रकल्पात प्रामुख्याने नदी स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे. शहरातील नदी-नाल्यांमध्ये वाहणारे सांडपाणी नदीपात्रात न जाता ते संकलित करून मलनिस्सारण केंद्राकडे वळविले जाणार आहे. त्याचबरोबर अहमदाबादच्या साबरमती नदी प्रकल्पाच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, जैवविविधता जपणे, विविध घाटांचे नूतनीकरण करणे तसेच दहनभूमी अत्याधुनिक व प्रदूषणमुक्त करणे, नदीकिनारी व घाटांवर असलेला घनकचरा संकलित करणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे, जलचरांच्या विविध प्रजाती पूर्ववत करणे व त्यांचे संवर्धन करणे या बाबींचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये नाशिक शहरामध्ये तपोवन आगर टाकळी पंचक, चेहेडी व गंगापूर या पाच ठिकाणी मलनिस्सारण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पिंपळगाव खांब येथे अमृत योजने अंतर्गत मलनिस्सारण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामटवाडा व मखमलाबाद या दोन ठिकाणी मलनिस्सारण केंद्रासाठी मंजूर विकास योजनेमध्ये आरक्षण दर्शविण्यात आले आहे. मखमलाबाद व आगर टाकळी सिव्हरेज झोनसाठी दोन्ही ठिकाणी येथे सिंहस्थापूर्वी मलनिस्सारण केंद्र बांधणे आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी प्रथम भूसंपादन केले जाणार आहे.

‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत या कामांचा समावेश

महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती क्षमता वाढ व सुधारणा, अडविणे व वळविणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिस्सारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित झालेल्या व होणाऱ्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलिनिस्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी सिवर लाइनचे जाळे टाकण्याची कामे करणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा समावेश आहे.

‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या आठवडाभरात सल्लागार संस्थेमार्फत महापालिकेला सादर केला जाणार आहे. या आराखड्याची तपासणी केल्यानंतर महिनाअखेरीस यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल.

– उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, मनपा.

हेही वाचा :

Back to top button