नाशिकमधील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तंबूत डेरा, एका रात्रीत उभारले दुसरे कार्यालय | पुढारी

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तंबूत डेरा, एका रात्रीत उभारले दुसरे कार्यालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून, नाशिकमध्ये अजित पवार समर्थकांनी राष्ट्रवादीच्या तीनमजली हायटेक कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर शरद पवार समर्थकांनी एका रात्रीत मुंबई नाका येथे तंबूत दुसरे कार्यालय उभारले आहे. राज्यातील सत्तेचा गैरफायदा घेत राष्ट्रवादीचे कार्यालय बळकावल्याचा आरोप करत ज्या दिवशी पोलिस बंदोबस्त हटेल त्या दिवशी राष्ट्रवादीच्या मूळ कार्यालयाचा ताबा घेऊ, असा दावा शरद पवार समर्थकांकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेविरोधात बंड पुकारात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. यामुळे नाशिकमध्ये अजित पवार समर्थक व शरद पवार समर्थक असे दोन गट पडले. नाशिकवर वर्चस्व असलेले छगन भुजबळ यांनीदेखील अजित पवार यांची साथ केल्याने बलशाली बनलेल्या अजित पवार गटाने मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनावर ताबा मिळविला. शरद पवार गटाला कार्यालय प्रवेशास मज्जाव करण्यात आल्याने गेल्या २ जुलै रोजी नाशकात दोन्ही गटांत मोठा राडा झाला. तब्बल दीड महिन्यानंतर आता शरद पवार गटाने आगामी निवडणुका लक्षात घेत पक्ष विस्तार व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी मुंबई नाका परिसरातच नवीन कार्यालयाचा तंबू ठोकला आहे. या कार्यालयातच स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहणदेखील जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड व शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

पक्षाचे मूळ कार्यालय राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नावे असूनदेखील पोलिसांच्या मदतीने अजित पवार समर्थकांनी या कार्यालयाचा ताबा मिळविला आहे. आमच्याकडे निष्ठावंत शरद पवार समर्थक आहेत. तंबूत कार्यालय बनवूनदेखील पक्षाचा विस्तार करून दाखवू.

– गजानन शेलार, शहराध्यक्ष

शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून, जिल्हाभरातून पदाधिकारी युवा कार्यकर्ते पक्षाच्या कामकाजासाठी नाशिकमध्ये येत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे कार्यालयात थाटले आहे. लवकरच पक्षाच्या अधिकृत कार्यालयाचा ताबा मिळेल.

– कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष

हेही वाचा :

Back to top button