नाशिकच्या म्हसरूळला तलाठी परीक्षेचा पेपर फुटला, संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे राज्यस्तरीय तलाठी भरती परीक्षेत गुरुवारी (दि. १७) पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची घटना घडली. शहरातील म्हसरूळ येथील परीक्षा केंद्राबाहेर पाेलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताच्या ताब्यातून पाेलिसांना टॅब, दोन मोबाइल, वाॅकी-टाॅकी, हेडफोन्स सापडले. अधिक तपासणीत मोबाइलमध्ये पेपरमधील प्रश्नांचे छायाचित्र आढळले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पाेलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
राज्यभरात एकाच वेळी तलाठी भरती राबविण्यात येत आहे. टीसीएसमार्फत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये गुरुवार (दि. १७) पासून भरती पेपर प्रक्रिया सुरू झाली. नाशिक जिल्ह्यात सुमारे ८० हजार उमेदवार आहेत. त्यानुसार टीसीएसकडून जिल्ह्यामध्ये ११ केंद्रांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. त्यात नाशिक शहरातील आठ तसेच येवला, सिन्नर व त्र्यंबकेश्वर येथील प्रत्येकी एका केंद्राचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २२ हजार ३०० उमेदवारांची परीक्षा होणार आहे.
शहरातील म्हसरूळच्या केंद्रात सकाळी ९ च्या सुमारास पहिल्या टप्प्यातील पहिल्या पेपरला प्रारंभ झाला. त्याचवेळी केंद्राबाहेर संशयित असल्याची तक्रार म्हसरूळ पाेलिसांकडे आली होती. त्यानुसार पाेलिसांनी संशयिताची तपासणी करत त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील साहित्य जप्त केले. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
पाेलिसांना संपूर्ण सहकार्य
तलाठी भरतीत म्हसरूळ येथील केंद्राबाहेर काहीसा गोंधळ निर्माण झाला. याबाबत पाेलिसांकडून संशयिताची चाैकशी केली जात असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याबद्दल ते निर्णय घेतील. या प्रकरणी पाेलिसांना संपूर्ण मदत करण्यात येणार आहे. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस संस्थेकडून काही तांत्रिक माहिती हवी असल्यास लेखी पत्र द्यावे, अशा सूचनाही पाेलिसांना केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.
हेही वाचा :