नूतन सहकारी बँकेत 3.58 कोटींचा अपहार

नूतन सहकारी बँकेत 3.58 कोटींचा अपहार
Published on
Updated on

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेत पदाचा दुरुपयोग करीत तसेच संचालक मंडळाची मंजुरी न घेता नियमबाह्य कर्ज वाटप, थकबाकी असतानाही कर्ज देऊन 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात तब्बल तीन कोटी 58 लाख 37 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रकाश शंकरराव पुजारी, त्यांची पत्नी कांचन प्रकाश पुजारी (दोघे रा. आवाडे अपार्टमेंट मागे), शाखाधिकारी मलकारी आप्पासो लवटे (रा. धनगर गल्ली, गावभाग), सीनिअर मॅनेजर रावसाहेब महादेव जावळे (रा. राजेंद्रनगर कोल्हापूर), कर्ज विभाग प्रमुख राजेेंद्र गणपती जाधव (रा. सांगली नाका, इचलकरंजी) यांच्यासह तब्बल 19 जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. यापैकी अध्यक्षांसह 14 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी धोंडीराम आकाराम चौगुले (रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या अन्य संशयितांमध्ये शाखाधिकारी राजेंद्र जयपाल मौर्य (रा. सांगली नाका), पासिंग ऑफिसर सुरेखा जयपाल बडबडे (रा. बिग बाजारजवळ), ज्युनिअर ऑफिसर मारुती कोंडिबा अनुसे (रा. माले मुडशिंगी), शिपाई अभिजित मल्हारी सोलगे (रा. माणगावकर बोळ), कॅशियर वैभव बाळगोंडा गवळी (रा. बरगे मळा), क्लार्क निलेश शिवाजी दळवी (रा. लिगाडे मळा), कॅशियर रोहित बळवंत कवठेकर (रा. निंबळक, ता. तासगाव), क्लार्क सर्जेराव महादेव जगताप (रा. येडेमच्छिंद्र, जि. सांगली), आयटी मॅनेजर शेखर नारायण खरात (रा. सांगलीवाडी), शाखाधिकारी प्रभाकर बाजीराव कदम (रा. पलूस ता. सांगली), शाखाधिकारी राहुल प्रकाश पाटील (रा. जयसिंगपूर), शाखाधिकारी विकास वसंत साळुंखे (रा. राजापूर, ता. तासगाव), क्लार्क सारिका निलेश कडतारे (रा. सरनोबतवाडी), शिपाई विजय परशराम माळी (रा. ढोर वेस तालीम, इचलकरंजी) यांचा समावेश आहे.

याबाबतची माहिती गावभागचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली. येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. प्रशासकांच्या पत्रानुसार 2020-21 आणि 2021-22 सालचे लेखापरीक्षण करण्यासाठी फिर्यादी धोंडिराम चौगुले (चार्टर्ड अकौंटंट) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या लेखापरीक्षणामध्ये विविध गंभीर बाबी निदर्शनास आल्या. त्यानुसार त्यांनी याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये संशयितांनी कर्जाची येणे बाकी असताना बनावट निरंक दाखले देणे व ते खरे म्हणून वापरणे, कर्जाची बाकी असताना बेकायदेशीर उचल देणे, कर्जाला बेकायदेशीर सूट देणे, बँक स्टाफला व्हौचरवर कोणत्या कामासाठी अ‍ॅडव्हान्स दिला याचा उल्लेख न करता बेकायदेशीर बनावट व्हौचर देणे, नातेवाईकांना कर्ज देता येत नसल्याचा नियम डावलून कर्ज देण्यासह येणे बाकी असताना चेअरमन व पत्नी यांना नियमबाह्य कर्ज देणे, कर्जाचे दस्तऐवज न ठेवता व संचालक मंडळाची मंजुरी न घेता कर्ज वाटप करणे, ठेवीदारांना ठेवीच्या बदल्यात कबूल विनिर्दिष्ट सेवा देताना कसूर करत बँकेची गैरहानी करण्याच्या हेतूने पदाचा दुरुपयोग केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार 2020-21 मध्ये 1 कोटी 50 लाख 39 हजार आणि 2021-22 सालात 2 कोटी 7 लाख 98 हजार असा एकूण 3 कोटी 58 लाख 37 हजाराचा अपहार व गैरव्यवहार सर्वांनी संगनमताने केल्याचा ठपका अध्यक्षासह इतर 19 संशयितांवर ठेवला आहे.

इचलकरंजी मुख्य शाखा, सहकारनगर शाखा, पलूस आणि इस्लामपूर शाखेत हा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. गुन्हा दाखल होताच गावभाग पोलिासांनी तातडीने हालचाली करीत अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह अन्य 14 जणांना ताब्यात घेवून अटक केली तर उर्वरित सुरेखा बडबडे, सर्जेराव जगताप, राहुल पाटील, सारिका कडतारे आणि कांचन पुजारी यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेल्या संशयितांना गुरुवारी पोलिस बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयात याबाबतची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने अध्यक्ष प्रकाश पुजारी, राजेंद्र जाधव, रावसाहेब जावळे, राजेंद्र मौर्य, मलकारी लवटे, प्रभाकर कदम, विकास साळुंखे यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर अन्य 7 संशयितांना 19 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयाबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news