नाशिक : भावली धरणाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

नाशिक : भावली धरणाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

घोटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

गेल्या चार-पाच दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात पावसाने आपली खेळी सुरु ठेवल्याने भावली धरणाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल सुरु झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात धरण पुर्ण भरेल.

इगतपुरी तालुक्यातील धरणसाठ्यात अद्यपही पाहिजे तसा जलसाठा संचित झाला नाही मात्र गेल्या महिनाभरात झालेल्या पावसामुळे दारणा, मुकणे व भाम धरणांत ५० टक्क्यांपुढे जलसाठा झाला लागला आहे. इगतपुरी तालुक्यात चोवीस तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली.

दारणा धरणात ७८ टक्के पाणीसाठा झाला असून ११०० क्यूसेसने पाण्याच्या विसर्ग नांदूरमध्येमेश्वर धरणाच्या दिशेने होत आहे. या रिपरिप पावसामुळे शेतीच्या कामांना चांगली सुरुवात झाली असून काही ठिकाणी भात लागवडीची कामेही सुरु आहे.

रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत वाकी धरणात अवघे २०. ५१ टक्के, दारणा धरणात ७७. ९४ टक्के तर भावलीत ९०. ३१ टक्के जलसाठा झाला आहे. रविवारपर्यंत झालेल्या पावसाने फक्त दारणा, भाम, मुकणे व भावली या धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे. मात्र वाकी धरणात अद्यापही २० टक्केच साठा आहे, तर कडवा, मुकणे धरणांच्या जलसाठयात संथ वाढ होत आहे. तालुक्यामध्ये रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत आत्तापर्यंत एकूण १५१२ मिमी पावसाची नोंद झाली.

नाशिक जिल्ह्याच्या चेरापुंजीत पावसाची संथ गतीने वाटचाल सुरु असल्याने धरणात संथगतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस नसताना तालुक्यात पश्चिम भागात मात्र सातत्याने पाऊस असल्याने शेतीची कामे जोरदार सुरु असून बळीराजा शेतीकामात व्यस्त आहे. इगतपुरी घोटीसह ग्रामीण भागातही पावसाने जोर धरला आहे. परंतु एकूण आकडेवारी बघता अजून बराच लांब पल्ला गाठायचा आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news