नाशिक : शेततळ्यात बुडून विद्यार्थाचा मृत्यू, मृतदेह रस्त्यावर ठेवत नातेवाइकांचा ठिय्या | पुढारी

नाशिक : शेततळ्यात बुडून विद्यार्थाचा मृत्यू, मृतदेह रस्त्यावर ठेवत नातेवाइकांचा ठिय्या

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील जातेगाव येथील पाटील कृषी तंत्रविदयालय येथील शेततळ्यात बुडून १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सागर म्हसू कांदे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी नातेवाइकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला. अखेर संबधितांवर गुन्हा दाखल झाल्याने नातेवाइकांकडून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव बुद्रुक येथील सागर कांदे हा जातेगाव येथील पाटील कृषी विद्यालयात शिक्षण घेत होता. येथील शेततळ्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. यानंतर सागरचा मृतदेह नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. जोपर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतला होता. यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर नातेवाइकांनी नांदगाव येथील उड्डाण पूल चौफुलीवर मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस आणि तहसीलदार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही नातेवाईक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर मृत सागरचे वडील म्हसू कांदे यांच्या लेखी तक्रारीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची प्रत नातेवाइकांच्या हातात आल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. दरम्यान, बराच काळ रास्ता रोको झाल्याने नांदगाव, चाळीसगाव, संभाजीनगर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संबंधित बातम्या

हेही वाचा :

Back to top button