ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत वर्षा पर्यटनाची हौसमौज करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांपैकी चार वेगवेगळ्या घटनांमध्ये सातजणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमुळे 16 जुलैचा वर्षा पर्यटनाचा संडे 'ब्लॅक संडे' ठरला आहे. ठाण्यात उपवन तलावात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला असून, हा विद्यार्थी आर. जे. ठाकूर ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. त्याचे आदित्य असे नाव आहे. बाकीचे विद्यार्थी बचावले आहेत.
पालघर जिल्ह्यातील जव्हार दाबोसा धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांपैकी काही बुडत असल्याचे पाहून उडी मारून वाचवण्यासाठी गेलेला जव्हार पंचायत समितीतील कनिष्ठ सहायक देवेंद्र नामदेव शिंदे बुडाला असून, बारा तासांपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. मात्र, दुसरा मित्र बचावला आहे. खोल पाण्याच्या डोहात मारलेली त्याची उडी अखेरची ठरली. विरार येथील पापडखिंड धरणात पर्यटनासाठी गेलेली तीन मुले पाण्यात बुडाली. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, ओम बोराडे (वय 11) याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. विरारच्या फूलपाडा येथील धबधबा आणि धरण असलेल्या परिसरात ही मुले पोहण्यासाठी गेली होती.
भाईंदर पश्चिम खाडीत सुरक्षेसाठी असलेला सुरक्षारक्षक रमेश पाटील (34, मूळ रा. सातारा) हा समुद्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मात्र, रविवारी व सोमवारी शोधमोहीम राबवूनही तो सापडलेला नाही. रायगड जिल्ह्यातही पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये पेणमधील लिंगडा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या इलान बेन्झामिन वाचकर (25), इस्रायल बेन्झामिन वाचकर (23) अलिबाग थरोंडा येथील या दोन भावांचा बुडून मृत्यू झाला; तर दुसर्या घटनेत खालापूर तालुक्यातील पळस धरणात पोहायला गेलेला विनोद निरंजन गजाकोश (42, रा. सुभाषनगर, धारावी, मुंबई) याचा बुडून मृत्यू झाला.
वर्षा पर्यटनावर पोलिसांनी सर्वत्र बंदी घातली आहे. 144 कलमही लागू केले, तरी वर्षा पर्यटनस्थळांवर होणारी प्रचंड गर्दी आणि अतिउत्साह पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे.