नाशिक : पेठरोडसह दिंडोरी रोडवरील कचऱ्याचे ढीग हटवले | दैनिक पुढारी इम्पॅक्ट | पुढारी

नाशिक : पेठरोडसह दिंडोरी रोडवरील कचऱ्याचे ढीग हटवले | दैनिक पुढारी इम्पॅक्ट

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी व पेठ रोडवरील पाटालगत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याबाबत व मनपा याबाबत कोणतीही दाखल घेत नसल्याच्या अनेक तक्रारी दैनिक पुढारीस प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत पेठ व दिंडोरी रोडवर रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष याबाबत वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. यानंतर मनपाच्या स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने कर्मचारी पाठवून तेथील कचरा उचलून साफ सफाई केली आहे.

पंचवटीत दररोज जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दिंडोरी व पेठ रोड मार्गे गुजरातहून येणाऱ्या भाविकांना मात्र शहरात प्रवेश केल्यानंतर काही अंतरावर पोहचताच कचऱ्याच्या ढीगांचे दर्शन घडत होते. तसेच, शहरातील रोज ये-जा करणारे पादचारी व वाहनचालकांनाही हे चित्र बघावयास मिळते. यामुळे साचलेला कचरा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी उचलावा आणि या समस्येकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली होती.

वृत्त प्रसिध्द केल्यानंतर तुर्त तरी नागरिकांनी येथील कचऱ्याबाबत सुटकेचा निःश्वास सोडला असुन हा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघावा अशा अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रश्न कायमचा मार्गी कधी लागणार

कचऱ्याचा प्रश्न हा दिंडोरी व पेठरोडवासियांना काही नवीन नाही. यावरून स्वच्छता विभाग व माजी लोकप्रतिनिधी यांचे नेहमीच वाद सुरू असतात. स्वच्छ भारत अभियानात क्रमांक पटकाविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून दरवर्षी अटापिटा केला जातो. मात्र हा फक्त स्पर्धा संपेपर्यंत असतो व निकाल लागला की पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्याचं प्रमाणे एखादया वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिध्द झाल्यास तात्पुरती मलमपट्टी होते. पुन्हा परिस्थिती तशीचं राहते. याकरिता प्रशासनाने नागरीकांना व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन कायम स्वरुपी काही तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

Back to top button