नाशिक : 'त्या' उमेदवार नियुक्तीचा खटला जलद चालवा - खा. हेमंत गोडसे | पुढारी

नाशिक : 'त्या' उमेदवार नियुक्तीचा खटला जलद चालवा - खा. हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासनाने मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले राज्यभरातील सुमारे दोन हजार उमेदवार नियुक्तीपासून वंचित आहेत. यामुळे नियुक्त्या रखडलेल्यांना न्यायासाठी याबाबतचा खटला उच्च न्यायालयात जलद गतीने चालवावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याकडे केली आहे.

मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर आर्थिक दुर्बल विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक धोरणात न्याय मिळावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू आहे. यातूनच शासनाने आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण दिले होते. मात्र ते रद्द झाल्याने सरकारने यावर एसईबीसी टू ईडब्लूएसचा पर्याय दिला होता. यावर काहीजण न्यायालयात गेल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाचा खटला जलद चालवावा, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button