नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक | पुढारी

नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

थकीत मालमत्ता करवसुलीसाठी महापालिकेच्या विविध कर विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असून, त्याकरिता सवलत योजना राबविली जात आहे. या योजनेचा अद्याप अनेकांनी लाभ घेतला असला तरी, बड्या थकबाकीदारांनी याकडे सपशेल कानाडोळा केला आहे. अशात बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कर विभागाकडून व्यूहरचना आखली जात असून, प्रसंगी जप्तीची कारवाई करण्याची तयारी कर विभागाने केली आहे.

गत आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे ध्येय पूर्ण करणाऱ्या कर विभागाला चालू आर्थिक वर्षात २१० कोटींचे ध्येय देण्यात आले आहे. सवलत योजनेच्या माध्यमातून पहिल्या दोन महिन्यांतच मोठी वसुली झाली असली तरी, बड्या थकबाकीदारांकडच्या वसुलीचे मोठे आव्हान कर विभागासमोर आहे. या थकबाकीदारांनी सवलत योजनेकडेसुद्धा कानाडोळा केल्याने, यांच्याकडील वसुलीसाठी कर विभागाकडून व्यूहरचना आखली जात आहे. पुढील महिन्यात या सर्व थकबाकीदारांशी संपर्क साधण्याबाबतच्या सूचना कर विभागाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रारंभी या थकबाकीदारांची भेट घेऊन त्यांना थकबाकी भरण्याबाबतचे आव्हान केले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांना नोटीस बजावली जाईल. त्यानंतर जप्ती कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

एखादा थकबाकीदार जर थकबाकीविरोधात न्यायालयात गेला असेल तर त्याबाबतचाही कर विभागाकडून पाठपुरावा केला जाणार आहे. न्यायालयाचा निकाल मनपाच्या बाजूने लागल्यास, तत्काळ कर वसुलीबाबतची प्रसंगी जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्राहक – थकबाकी

११ – एक कोटी

३५ – ५० लाख

७५ – २५ लाख

१९४ – १० लाख

३४४ – पाच लाख

७८६ – अडीच लाख

ग्राहकांनी थकबाकी भरावी याकरिता महापालिकेकडून सवलत योजना राबविली जात आहे. मात्र, अशातही थकबाकी बड्या थकबाकीदारांकडून त्याचा लाभ घेतला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील महिन्यात बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

– श्रीकांत पवार, उपआयुक्त, विविध कर विभाग, मनपा

हेही वाचा :

Back to top button