नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news
जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक आरोग्य विभागातील कपडे धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आला आहे. त्यानंतर आता जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आहारातही कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत तब्बल एक कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्यातील जादा बिलांची वसुली अद्याप झाली नसल्याची बाबही समोर आली आहे.

ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुण्याच्या बिलांत फेरफार करून ६७ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यापैकी ३० लाख रुपये ठेकेदाराने घेतले असून, ३७ लाखांचे बिल रोखण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी संबंधित ठेकेदारास नोटीस बजावून पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील आहार घोटाळा समोर आला आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून संबंधित ठेकेदाराने बनावट बिलांमार्फत १ कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचे बिल मंजूर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. २०२२ पासून गैरव्यवहारातील बिलाचे पैसे वसूल होत नसल्याने चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे आहार घोटाळ्यातील वसुली झालेली नसताना धुलाई घोटाळ्यातील वसुली होणार का, तसेच गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई होणार का? याबाबत चर्चा रंगली आहे.

माधव सेनेकडून कारवाईची मागणी

या घोटाळ्यातील वसुली करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व कंपनी काळ्या यादीत टाकावी, अशी मागणी माधव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. माधव सेनेचे पदाधिकारी सोमनाथ गायकवाड, महेश मोरे, हरीश केदारे, सतीष मोहिते, संदीप देवकाते आदींनी आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थाेरात, जिल्हा कोषागार कार्यालयास निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याच नाही

माधव सेनेचे सोमनाथ गायकवाड यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यानंतर यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, बिलांची पडताळणी केली असता त्यावर आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच पेड अँड कॅन्सल\पास फॉर पेमेंट केलेले नाही, कार्यालयीन आदेशावर जावक क्रमांक, दिनांक नमूद केलेले नाही. नियंत्रण अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याचाही शेरा देण्यात आला आहे.

आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून आहार घोटाळ्यासंदर्भात चौकशी केली. मात्र, संबंधितांवर कोणत्या स्वरूपाची कारवाई करावी यासंदर्भात पत्र किंवा सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही कारवाई केलेली नाही. त्याचप्रमाणे धुलाई घोटाळ्यातील ठेकेदाराकडून वसुलीच्या नोटिशीस नुकतेच उत्तर आले असून, त्याने मुदत कमी दिल्याचे उत्तरात म्हटले आहे. त्याबाबत बुधवारी (दि.१४) निर्णय घेतला जाईल.

– डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय 

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news