Dhule : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात जन आक्रोश मोर्चा | पुढारी

Dhule : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात जन आक्रोश मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा 

धुळ्यात झालेल्या मूर्ती विटंबनेच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्तीची देखील मिरवणूक काढण्यात आली. या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

धुळ्यातील चाळीसगाव रोड चौफुलीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता यांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे, भारतीय जनता पार्टीचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदीप करपे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

हा मोर्चा आग्रा रस्त्यावरून श्रीराम मंदिराजवळ आला. यावेळी मिरवणुकीतील मूर्तींची पूजन करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा शिवतीर्थापर्यंत आणण्यात आला. शिवतीर्थावर छोटेखानी झालेल्या सभेत डॉक्टर सुभाष भामरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मूर्ती विटंबना करणाऱ्या आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कोणतेही प्रकारचे झालेले हल्ले आता सहन केले जाणार नाही. त्या विरोधात अशाच पद्धतीने निषेध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तर विटंबना झालेल्या मंदिरात 14 जून रोजी नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमात देखील सहभाग नोंदवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभाग नोंदवला.

या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, प्राध्यापक शरद पाटील, डॉक्टर सुशील महाजन तसेच शिंदे गटाचे मनोज मोरे, संजय वाल्हे, सतीश महाले, यांच्यासह हिंदू जनजागरण समितीचे भाऊ रुद्र यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शिघ्र कृती दलाचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून होते. या मोर्चात 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्यांची बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली. तर मोर्चा दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची देखील मदत घेण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button