नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड | पुढारी

नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उन्हाच्या तीव्र झळांनी जिल्हा होरपळला असताना धरणांनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या केवळ ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान विभागाने मान्सून सरासरी गाठेल, असा भाकीत वर्तविले असले, तरी अल निनोचे सावट कायम असणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे.

यंदाच्या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडेल, असे भाकीत केले जात होते. मात्र, भारतीय हवामान विभागाने नेहमीपेक्षा देशात मान्सून दोन ते तीन दिवस उशिरा येण्याची शक्यता वर्तविली आहे. महाराष्ट्रात तो सरासरी गाठेल, असेही सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र, नाशिकच्या धरणांमधील सध्याचा उपयुक्त साठा विचारात घेता, हे चित्र म्हणावे तेवढे आशादायक नाही. जिल्ह्यातील प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये एकूण १९ हजार ५२२ दलघफू साठा शिल्लक असून, त्याचे प्रमाण अवघे ३० टक्के इतके आहे. यातील निम्म्या प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होण्यामागे दररोज होणारा उपसा व गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या वाढलेल्या कडाक्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे धरणांनी तळ गाठला आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा ४१ टक्के पाणीसाठा आहे, तर समूहातील गौतमी व आळंदी प्रकल्पांत प्रत्येकी ११, तर काश्यपीत १७ टक्के पाणी शिल्लक आहे. इगतपुरीतील दारणा धरण ४३ टक्के भरलेले आहे. याशिवाय पालखेड, ओझरखेड तसेच गिरणा खोऱ्यातील धरणांमध्येही मर्यादित साठा आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मान्सून सरासरी गाठेल, असे सांगण्यात आले. मात्र, दुर्दैवाने अल निनोचा प्रभाव राहिल्यास पावसाला फटका बसू शकतो. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत प्रत्येकाने पाण्याच्या थेंबाथेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

धरणसाठा (दलघफू)
गंगापूर : 2,329, दारणा : 3,095, काश्यपी : 306, गाैतमी-गोदावरी: 214, आळंदी : 87, पालखेड : 101, करंजवण : 1461, वाघाड : 173, ओझरखेड : 573, पुणेगाव : 99, तिसगाव : 35, भावली : 201, मुकणे : 3,358, वालदेवी : 243, कडवा : 423, नांदूरमधमेश्वर : 248, चणकापूर : 769, हरणबारी : 589, केळझर : 208, नागासाक्या : 01, गिरणा : 4,470, पुनद : 476, माणिकपुंज : 00

हेही वाचा:

Back to top button