पुणे : पोलिस असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी घातला गंडा | पुढारी

पुणे : पोलिस असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी घातला गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका तरुणीला 6 लाख 99 हजारांचा गंडा घातला. ‘तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे. त्यामध्ये काही वस्तू असून, गुन्हेगार लोक तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करीत आहेत,’ असे म्हणत ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी 26 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही बालेवाडी गाव परिसरात राहण्यास असून, एका खासगी संस्थेत काम करते. एका व्यक्तीने त्यांना फोन करून तुम्ही एक पार्सल पाठविले असून, त्यामध्ये एक लॅपटॉप, क्रेडिट कार्ड, कपडे आणि चप्पल असल्याचे सांगितले. ते पार्सल मिस्टर जॅन लीन ताईपेई शहरात पाठविल्याचे सांगितले. त्या वेळी तरुणीने मी असे कोणतेही पार्सल पाठविले नसल्याचे सांगितले. त्या वेळी त्या व्यक्तीने तत्काळ पोलिसांना सांगा, असे सांगून आपल्याच एका साथीदाराकडे फोन ट्रान्स्फर केला. त्याने पोलिस असल्याचे सांगून तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असून, पैशांचा घोटाळा झाल्याचे सांगितले.

पुढे तरुणीला स्काईप अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून बँक खात्याची चौकशी करावी लागेल, असे सांगून केस अमली पदार्थ विभागाकडे पाठवत आहे, असे म्हणत त्यांच्या बँक खात्यातील पैसे चौकशीपर्यंत दुसर्‍या खात्यावर पाठविण्यास सांगितले. घाबरलेल्या तरुणीने सायबर चोरटे सांगतील त्याप्रमाणे पैसे पाठवून दिले. एका तासानंतर तरुणीने केसबाबत विचारणा केली तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण तपास करीत आहेत.

सायबर चोरट्यांकडून तरुणीची फसवणूक

यू-ट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका तरुणीला 4 लाख 34 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणीसोबत टेलिग्रामद्वारे संपर्क केला. त्यानंतर तीन यू-ट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगून, त्या बदल्यात 150 रुपये त्यांच्या खात्यावर पाठविले. त्यांना या पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. पुढे पेड टास्क देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी 4 लाख 34 हजार रुपये घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button