नाशिक : नागरिकांचा जीव जात असेल, तर जाऊ दे! : घंटागाडी ठेकेदाराची मस्ती

नाशिक : घंटागाडीचे जीर्ण झालेले टायर
नाशिक : घंटागाडीचे जीर्ण झालेले टायर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छता निरीक्षक : अहो साहेब, घंटागाडीचे टायर फाटले आहेत, त्यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो.
घंटागाडी ठेकेदार : जीव जात असेल, तर जाऊ दे ना, तुला काय करायचं?

स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी ठेकेदारांचा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये घंटागाडी ठेकेदारांची मस्ती दिसून येत असल्याने नाशिककरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 'लोकांचा जीव जात असेल, तर जाऊ दे' हे ठेकेदाराचे शब्द संतापजनक असून, अशा लोकांना घंटागाडीचा ठेका देणेच गैर असल्याच्या प्रतिक्रिया नाशिककरांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

शहरातील हॉटेलमधील कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी असून, या घंटागाडीची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. विशेषत: टायर जीर्ण झालेले असल्याने, या घंटागाडीची वाहतूक अत्यंत धोकादायक झालेली आहे. ही बाब महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित घंटागाडीच्या चालकाला याबाबतचा जाब विचारला. त्यानेही हतबलता व्यक्त करीत, टायर जीर्ण झाल्याने ब्रेकसुद्धा लागत नसून, ही गाडी रस्त्यावर चालविण्यास अजिबातच योग्य नसल्याची धक्कादायक बाब सांगितली. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकाने तत्काळ घंटागाडीचे फोटो काढून, घंटागाडी ठेकेदार अन् स्वच्छता निरीक्षक यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केले. मात्र, ही बाब घंटागाडी ठेकेदाराला चांगलीच झोंबली अन् त्याने संबंधित स्वच्छता निरीक्षकाला व्हॉट्सॲपवर कॉल करण्याचा सपाटा लावला. मात्र, स्वच्छता निरीक्षकाने त्याला दाद दिली नाही. अखेर त्याने स्वच्छता निरीक्षकाला फोन करीत, 'तू फोटो का शेअर केले?' असा जाब विचारला. स्वच्छता निरीक्षकाने, 'घंटागाडीचे टायर जीर्ण झाले आहेत, अशी घंटागाडी रस्त्यावर उतरवल्यास अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो.' असे त्यास सांगितले. त्यावर घंटागाडी ठेकेदाराने, 'नागरिकांचा जीव जात असेल, तर जाऊ दे ना, तुला काय करायचे? तू आम्हाला का शिकवत आहे?' असे संबंधित स्वच्छता निरीक्षकाला अत्यंत उर्मटपणे सुनावले. त्याचबरोबर एकेरी भाषेत संवाद साधत स्वच्छता निरीक्षकाला शिवीगाळही केली.

नाशिक : घंटागाडीचे जीर्ण झालेले टायर निखळण्याच्या स्थितीत आले आहे.
नाशिक : घंटागाडीचे जीर्ण झालेले टायर निखळण्याच्या स्थितीत आले आहे.

या सर्व प्रकाराची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून, घंटागाडी ठेकेदाराची मस्ती नाशिककरांमध्ये संताप व्यक्त करणारी ठरत आहे. यापूर्वी नांदुरुस्त घंटागाडी अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्या अपघातांत नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. असे असतानाही घंटागाडी ठेकेदारांनी यातून धडा न घेता नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरूच ठेवला असल्याने, या घंटागाडी ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता समोर येत आहे.

अश्लील भाषेत संवाद
या ऑडिओ क्लिपमध्ये ठेकेदार स्वच्छता निरीक्षकाशी अश्लील भाषेत संवाद साधताना दिसत आहे. स्वच्छता निरीक्षक मात्र, घंटागाड्या दुरुस्त करा अन्यथा अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो, असे वारंवार त्यास सांगत आहे. मात्र घंटागाडी ठेकेदार आपल्या मगरूरीत स्वच्छता निरीक्षकाला शिवीगाळ करीत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news