नाशिक : स्मार्ट सिटीच्या कामांचा आणखी वर्षभर मनस्ताप | पुढारी

नाशिक : स्मार्ट सिटीच्या कामांचा आणखी वर्षभर मनस्ताप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अत्यंत संथगतीने चालणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामांचा नाशिककरांना आणखी वर्षभर मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शहरात सुरू असलेली अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटी कंपनीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतवाढ देताना अतिरिक्त निधी देण्यास नकार दिला आहे. जून २०२४ पर्यंत स्मार्ट सिटी कंपनीला हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ५१ प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहेत. वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, जवाहरलाल नेहरू उद्यानातील झाडांची प्रतिकृती, उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण, व्हिक्टोरिया पुलावर रंगीत संगीत कारंजा आदी प्रकल्प मनसेच्या सत्ताकाळातच पूर्ण झाले होते. त्या प्रकल्पांचादेखील स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये समावेश करण्यात आल्याने एकूणच नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या ५१ प्रकल्पांबद्दल संशय व्यक्त केला गेला. कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. सीताराम कुंटे यांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पांची संथगती चर्चेत आली.

ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत मखमलाबाद व नाशिक शिवारात सुनियोजित शहराचा प्रकल्पदेखील वादग्रस्त ठरला. या प्रकल्पाला काही शेतकऱ्यांनी विरोध केला, तर ज्या शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टी मोठ्या रस्त्यावर होत्या त्यांनी पाठिंबा दिला. नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर झाल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी प्रस्तावित नगर रचना अर्थात टीपी स्कीमला विरोध दर्शविला. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या दरम्यान स्मार्ट रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्तादेखील वादग्रस्त ठरला. सर्वाधिक वादग्रस्त ठरला तो गावठाण प्रकल्प. गावठाण पुनर्विकास प्रकल्पाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. स्काडा वॉटर मीटर प्रकल्पदेखील गुंडाळण्यात आला. केपीएमजी या सल्लागार संस्थेला देण्यात आलेली जवळपास ४० कोटी रुपयांची रक्कमदेखील वादग्रस्त ठरली. पंडित पलुस्कर सभागृह व कालिदास कलामंदिराचे पुनर्निर्माण हे प्रकल्प नाही म्हणायला पूर्ण झाले. पूर्ण झालेल्या प्रकल्पांपेक्षा अपूर्ण राहिलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचीच नाशिकमध्ये जास्त चर्चा रंगली. दरम्यान, हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता स्मार्ट सिटीला आणखी वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.

१२५० कोटींची कामे

स्मार्ट सिटी प्रकल्पांची नाशिक शहरात १२५० कोटींची कामे सुरू असून, ते अर्धवट आहेत. आता जून २०२४ पर्यंत ती पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने, स्मार्ट सिटी वर्षभरात ही कामे पूर्ण करणार काय? याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : 

Back to top button