राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आणि वावड्या; अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांचीही नावे चर्चेत | पुढारी

राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आणि वावड्या; अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांचीही नावे चर्चेत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून दुसऱ्या दिवशीही म्हणजे बुधवारी दिवसभर निव्वळ चर्चा आणि वावड्या उडत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचीही वावडी उडविण्यात आली. इतकेच नाही, तर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या नावाला पसंती; तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे रवाना झाल्याची चर्चा रंगली होती.

बुधवारी दुपारी जयंत पाटील पुण्यात, तर डॉ. जितेंद्र आव्हाड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होते. तरीही हे दोन्ही नेते नॉटरिचेबल असल्याचे बोलले जात होते. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याची चर्चा सुरू असताना, पाटील यांनी आपण कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संशयाचा धुरळा खाली बसला.

शरद पवार बुधवारी सकाळी १० वाजता नियमितपणे आपल्या कामासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले होते. त्यामुळे येथेच नेत्यांची बैठक आयोजित करून पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली असताना, आता ही बैठक दुपारी ‘सिल्व्हर ओक’ येथे होईल, असे बोलले जात होते.

पवार यांनी दुपारपर्यंत अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ यांना भेटी दिल्या. या सर्वांनी आजही पवार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तर प्रतिष्ठानच्या पायऱ्यांवर ठिय्या दिला होता. तसेच पवार यांनी फेरविचार करावा, यासाठी पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरूच होते; पण पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
दुपारी चार वाजता ते ‘सिल्व्हर ओक कडे निघाले असताना सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत होत्या. यावरून त्या निवडणूक प्रचाराला गेल्या नसल्याचे स्पष्ट झाले. पवार सिल्व्हर ओक’ कडे निघून गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाध्यक्षपदासाठी आज कोणतीही बैठक आयोजित केली नव्हती, असे स्पष्ट केले. तसेच याबाबत आज निर्णय होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ नयेत : पटेल

आपल्या राजीम्याचा फेरविचार करण्यासाठी शरद पवार यांनी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यांना विचार करायला वेळ दिला पाहिजे. त्यामुळे अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अध्यक्षपदाचा निर्णय सर्वानुमते घेतला जाईल पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देऊ नयेत असे आवाहनही पटेल यांनी केले.

अध्यक्षपदात रस नाही पटेलांचे स्पष्टीकरण

शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी लेकीच्या पारड्यात आपले माप टाकल्याची चर्चा होऊ नये, यासाठी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी चर्चेचे खंडन केले. मला अध्यक्षपदात रस नसल्याचे सांगून त्यांनी आपली दिशा स्पष्ट केली.

Back to top button