नाशिक : सातपूरच्या शाळांसमोर टोळक्यांचा घोळका, पोलिस गस्तीची मागणी | पुढारी

नाशिक : सातपूरच्या शाळांसमोर टोळक्यांचा घोळका, पोलिस गस्तीची मागणी

नाशिक (सातपूर : पुढारी वृत्तसेवा

परिसरातील शाळा-महाविद्यालयांसह खासगी क्लासेसभोवती टवाळखोरांचा घोळका नजरेस पडत असून, त्यामुळे शाळकरी विद्यार्थिनींसह महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा भरतेवेळी, मधल्या सुटीत व शाळा सुटतेवेळी ह्या टवाळखोरांचा घोळका मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या टवाळखोरांवर कडक कारवाईची मागणी पालकवर्गातून होत आहे.

सातपूर परिसरात नाशिक महापालिकेच्या शाळांव्यतिरिक्त एक महाविद्यालय व खासगी शिक्षणसंस्थांच्या 10 ते 12 शाळा आहेत. कामगार वस्ती असलेल्या या परिसरातून पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश यात आहे. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, जनता महाविद्यालय, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, प्रगती विद्यालय, हिरे माध्यमिक विद्यालय, मीनाताई ठाकरे उद्यान, राज्य कर्मचारी येथील उद्यान, सप्तशृंगी मंदिर परिसर, जिजामाता मनपा शाळा क्र. ९६, मौले हॉल परिसर आदी परिसरांत टवाळखोरांचा घोळका दिसून येतो.

नगर : ठाकरे गटाच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता कार्यकर्त्यांना बैठकांपासून दूर ठेवून डावलले जात असल्याचा आरोप

पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

धूम स्टाइल वाहन चालवणे, मुलींचा पाठलाग करत छेडछाड करणे, शाळेजवळ सिगारेट ओढणे, शाळेतील विद्यार्थ्यांवर ‘भाईगिरी’ करणे, विद्यार्थिनींना वेगवेगळे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, ग्रुपने विद्यार्थ्यांना दमदाटी करत मारामारी करणे आदी प्रकार नित्याचेच झाले आहेत. याबाबत शाळा प्रशासनाने अनेकदा पोलिस ठाण्यात तक्रारही केली आहे. मात्र पोलिस वाहन दिसताच हे टवाळखोर धूम ठोकत पलायन करतात. याकडे गांभीर्याने न बघितल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती पालक व्यक्त करत आहेत.

टवाळखोरांबाबत पोलिसांमध्ये वारंवार तक्रार दिली आहे. टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी. टवाळखोरांशी शालेय विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे संबध आढळून आल्यास त्या विद्यार्थ्याचे नाव शाळेतून कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी याची नोंद घेत आपल्या पाल्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

– अनिल माळी, मुख्याध्यापक, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी

पोलिसांनी साध्या वेशात गस्त घालावी. पोलिस वाहन किंवा पोलिस दिसताच टवाळखोर पलायन करतात. त्यामुळे पोलिसांनी शाळा भरताना, मधल्या सुटीत व शाळा सुटतेवेळी साध्या वेषात गस्त घालावी. जेणेकरून टवाळखोरांचा बंदोबस्त होऊ शकेल.

– रोहिणी देवरे, सामाजिक कार्यकर्त्या

हेही वाचा :

Back to top button