Sant Nivrittinath Yatra : भक्तीरसात न्हाली त्र्यंबकनगरी, लाखो वारकऱ्यांची गर्दी | पुढारी

Sant Nivrittinath Yatra : भक्तीरसात न्हाली त्र्यंबकनगरी, लाखो वारकऱ्यांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

पौषवारीनिमित्त लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. विठूनामाच्या आणि निवृत्तिनाथांच्या (Sant Nivrittinath Yatra) नामाने त्र्यंबकचा प्रत्येक कानाकोपरा दुमदुमून गेला होता. राज्यातून आलेले लाखो भाविक संत निवृत्तिनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके टेकवून कुतार्थ झाले. यंदा 500 हून अधिक दिंड्या शहरात दाखल झाल्या.

पौषवारीनिमित्त दुपारी चारच्या सुमारास संत निवृत्तिनाथांची पालखी (Sant Nivrittinath Yatra) चांदीच्या रथातून भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात आली. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. रथाच्या पुढे भगव्या पताका, विणेकरी, टाळकरी होते. ग्रामस्थांनी शहरात रथमार्गावर सडा टाकत रांगोळ्या काढल्या होत्या. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, सदस्य माधव महाराज राठी, अनिल गोसावी आणि सदस्य तसेच मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, जयंत महाराज गोसावी, बाळासाहेब डावरे यासह मानकरी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त भूषण अडसरे यांसह सदस्यांनी स्वागत केले. रथ मंदिरात परतला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते.

अन् वारकरी कृतार्थ

पौषवारीनिमित्त लाखो वारकरी भाविक संत निवृत्तिनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके टेकवून कुतार्थ झाले. सलग दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने वारी झाली नव्हती. यावर्षी दुप्पट उत्साहाने यात्रा झाली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत दिंड्यांचे आगमन झाले. जवळपास 500 दिंड्या शहरात दाखल झाल्या आणि दशमीच्या रात्रीला ब्रह्मगिरीला जाग आली. हरिनामाने अवघा परिसर दुमदुमला. जागा मिळेल तेथे दिंड्यांच्या राहुट्या उभारल्या आणि टाळ-मृदंगाच्या ठेक्यात हरिनामाचा गजर होत राहिला.

कुशावर्तावर स्नान करत मंगळवारी रात्रीपासूनच वारकरी दर्शनबारीत उभे राहिले. काही ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला गेले, तर काही सकाळी ब्रह्मगिरी पर्वतावर पोहोचले. त्र्यंबकनगरी दोन दिवसांपासून भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज (Sant Nivrittinath Yatra) संजीवन समाधी महापूजा करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे सपत्नीक उपस्थित होते. पहाटेच्या या महापूजेस आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, भाजपचे लक्ष्मण सावजी, मुख्याधिकारी संजय जाधव, सुरेश गंगापुत्र, विश्वस्त भूषण अडसरे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव सोमनाथ घोटेकर उपस्थित होते. आचारसंहिता संपल्यानंतर विश्वस्त आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन मंदिर विकासकामांबाबत विचारविनिमय करण्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान, महापूजा आटोपल्यानंतर भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात सोवळे वस्त्र परिधान करत गर्भगृहात जाऊन त्यांनी ज्योर्तिर्लिंगाची पूजा केली.

हेही वाचा :

Back to top button