नाशिक : ग्रामसेविका झाल्या “फेस ऑफ नाशिक मिसेस ” च्या मानकरी | पुढारी

नाशिक : ग्रामसेविका झाल्या "फेस ऑफ नाशिक मिसेस " च्या मानकरी

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यातील वाकी बिटुर्ली येथील ग्रामसेविका ज्योती प्रकाश केदारे यांना मिरॅकल इव्हेंटच्या वतीने “फेस ऑफ नाशिक मिसेस २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नाशिक येथे आयोजित सौंदर्य स्पर्धेत मिसेस गटातील “फेस ऑफ नाशिक” मधून त्यांनी हे यश मिळवले. ज्योती केदारे यांच्यामुळे नाशिकला नवा चेहरा मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ज्योती केदारे वाकी बिटुर्ली ग्रापंचायतीसह कुऱ्हेगांव येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, विस्तारधिकारी संजय पवार आदींनी त्यांचे अभिनंदन केले. आदर्श ग्रामसेविका तसेच उत्कृष्ट सुत्रसंचालिका असलेल्या ज्योती केदारे यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी पत्राद्वारे शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

केदारे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेट चद्रांची या ग्रामपंचायतीत नऊ वर्ष काम करत गावाला विकासाच्या प्रवाहात आणले. हागणदारीमुक्त योजना, सीएसआर निधीतून महीला प्रशिक्षण केंद्राची उभारणी करून तिथे महिलांना गोधडी बनविणे, शिलाई मशीन प्रशिक्षण, सॅनिटरी पॅड बनविणे, एमएससी आयटी प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविले आहेत. गावात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली. तसेच गावातील प्रत्येक घरासमोर एक पेरू व बदामचे झाड आहे. या कामाची पावती म्हणून “अन्याय अत्याचार निर्मुलन समिती उत्तर महाराष्ट्र यांचा २०२० चा समाजरत्न पुरस्कार, मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा २०२१ चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा २०२२ चा राष्ट्रस्तरीय नारीरत्न प्रतिभा सन्मान पुरस्कार प्राप्त झाले. त्याचबरोबर १०० पॉवरफुल पर्सनॅलिटीज या गटात ग्लाटर एक्स या संस्थेचा पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

नवनव्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी महिला कुठेही कमी पडत नाहीत. महिलांना मिळालेली सक्षमता समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपयुक्त आहे. अनेक महिलांनी सौंदर्यवती स्पर्धेसारख्या आणखी काही क्षेत्रात यश मिळवावे, यासाठी मी कायम पुढे असते. मला लाभलेले यश मला सहयोग देणाऱ्यांना मी समर्पित करते.  ज्योती केदारे, सौंदर्यवती स्पर्धा विजेत्या व ग्रामसेविका.

हेही वाचा:

Back to top button