Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज | पुढारी

Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पदवीधर मतदारसंघासाठी विभागातून 1 लाख 91 हजार 338 पदवीधर मतदारांचे अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. विभागात नगर जिल्ह्यातून सर्वाधिक 85 हजार 286 अर्ज आले आहेत. त्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातून केवळ 40 हजार 465 अर्ज प्राप्त झाले.

नाशिकसह राज्यातील सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत फेब—ुवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आत्तापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या मतदार नोंदणीला पहिल्या टप्प्यात पाचही जिल्ह्यांतून म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे दिवाळीच्या सलग सुट्या आणि त्यातच नोंदणीची क्लिष्ट प्रक्रिया होती. हीच अडचण लक्षात घेत विभागातील नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हा प्रशासनांनी दिवाळीनंतर विशेष नोंदणी मोहिमा राबविल्या. या मोहिमांना पदवीधरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने नोंदणीला गती मिळाली.

विभागातील पाचही जिल्ह्यांमधून सोमवार (दि.14)पर्यंत एकूण 1 लाख 91 हजार 338 अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये 1 लाख 31 हजार 744 अर्ज ऑफलाइन, तर 59 हजार 594 अर्ज ऑनलाइन पद्धतीने जमा झाले आहेत. प्रशासनाने दाखल अर्जांची पडताळणी केल्यानंतर 1 लाख 2 हजार 987 अर्ज मंजूर करून त्याचा डेटा आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केला. तर 2861 अर्ज अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान, 24 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरमध्ये पदवीधर मतदारसंघ प्रारूप याद्यांवर हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. त्या कालावधीतही मतदार नोंदणी करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्ये यंदा कमी नोंदणी
विभागातून नगर जिल्ह्यातून सर्वाधिक 85 हजार 286 अर्ज प्राप्त झाले आहेत. धुळ्यातून 20,200, जळगावमधून 27,257 तर नंदुरबारमधून 18 हजार 130 अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 15 ही तालुक्यांतून ऑफलाइन पद्धतीने 20 हजार 352, तर ऑनलाइन पद्धतीने 20 हजार 113 असे एकूण 40 हजार 465 अर्ज प्रशासनाकडे आले आहेत. त्यामधून 17 हजार 181 अर्जांची डाटा एंट्री करण्यात आली आहे. मात्र, 2017 ची तुलना केल्यास जिल्हाभरातून तेव्हा 96 हजार पदवीधर मतदारांनी नोंदणी केली होती. तो टप्पा गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button