पुणे : वैद्यकीय महाविद्यालयासाठी 7 निविदा; महापालिका अतिरिक्त आयुक्तांची माहिती | पुढारी

पुणे : वैद्यकीय महाविद्यालयासाठी 7 निविदा; महापालिका अतिरिक्त आयुक्तांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या बांधकामासाठी राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत सात प्रस्ताव प्राप्त झाले असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या मालकीचे एखादे वैद्यकीय महाविद्यालय असावे, शहरातील नागरिकांना कमी पैशात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. सध्या मंगळवार पेठेतील सणस शाळेत याची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, महाविद्यालयाची कायमस्वरूपी इमारत नायडू हॉस्पिटलच्या साडेबारा एकर जागेत बांधली जाणार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.

महाविद्यालयासह आवश्यक इमारती, वसतिगृह आणि हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर बांधण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते. यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 147 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मात्र, हॉस्पिटल आणि विद्यार्थ्यांचे वसतीगृह पीपीपी तत्त्वावरच बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, या प्रक्रियेत सात ठेकेदारांनी सहभाग नोंदवत प्रस्ताव दिले आहेत. या प्रस्तावांची छाननी करून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे बिनवडे यांनी सांगितले.

डॉ. नायडू रुग्णालयाचे स्थलांतर होणार
कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगांच्या साथीमध्ये डॉ. नायडू सांसर्गिक उपचार रुग्णालय वरदान ठरले आहे. मात्र, या रुग्णालयाच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि रुग्णालय, वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्यामुळे डॉ. नायडू रुग्णालयाचे स्थलांतर बाणेर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये करण्यात येणार असल्याचे बिनवडे यांनी सांगितले.

Back to top button