नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात | पुढारी

नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात

नाशिक : गौरव जोशी
सारूळ आणि परिसरात डोंगर पोखरल्याच्या कारणावरून सील करण्यात आलेले खडीक्रशर जोमात सुरू झाले आहेत. खाणपट्टेधारक व क्रशरचालकांकडून दिवसाढवळ्या डोंगर बोडके केले जात आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने सुनावणीचे नाव देत सोयीस्कररीत्या डोळेझाक केली असली तरी राजकीय दबावापुढे प्रशासन झुकल्याची चर्चा आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने डोंगर पोखरल्याचे कारण देत सारूळचे 19 आणि राजूरबहुला व पिंपळगावचे प्रत्येकी एक अशा एकूण 21 खाणपट्ट्यांवर कारवाई करत खडीक्रशर सील केले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांमध्ये सील केलेल्या खडीक्रशरचा खडखडाट सुरू झाला. दरम्यान, सारूळ आणि वाद काही नवीन मुद्दा नाही. यापूर्वीदेखील प्रशासनाने सारूळ भागात कारवाईचा बडेजाव केला. कारवाईच्या मोठ्या-मोठ्या बातम्याही प्रसिद्ध करून घेतल्या. परंतु, कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये सारूळची परिस्थिती जैसे-थेच होते. जणू काही झालेच नाही या आविर्भावात खाणपट्टेधारक आणि क्रशरचालक राजरोसपणे डोंगरांवर घाला घालतात. विशेष म्हणजे प्रशासनातील अधिकार्‍यांनाही क्रशरचालक दाद देत नसल्याने राजकीय वरदहस्ताशिवाय हे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सारूळ व परिसरातील डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहेत. दिवस-रात्र चालणार्‍या क्रशरच्या खडखडाटामुळे सारूळचा परिसर ढवळून निघत आहे. डोंगर पोखरणारे खाणपट्टेधारक आणि क्रशरचालक हे कोणत्या ना कोणत्या पक्षांच्या दावणीला बांधलेले आहेत. त्यामुळे आम्हाला कोणीही धक्का लावू शकत नाही, या आविर्भावात ते वावरत असतात. मात्र, दुसरीकडे डोंगरसंपदेवरच घाला घातल्याने निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. येणार्‍या पिढ्यांचे भविष्य त्यामुळे अंधारमय झाले असताना अवैधपणे डोंगर पोखरणार्‍यांना मात्र, त्याचे कोणतेही सोयरेसुतक उरलेले नाही.

पैशांचा जोर अन् साराच घोळ…
सारूळ व परिसरातील दगड-खाणींवर परिसरातील बहुसंख्य कुटुंबे मालामाल झाले आहेत. खुद्द खाणपट्टेधारक आणि क्रशरचालक हे गब्बर झाले आहेत. पैशांच्या जोरावर सारे काही करू शकतो, अशी त्यांची धारणा झाल्याचे बोलले जाते. प्रशासनाच्या कारवाईनंतर पैशांच्या जोरावर हे सर्व जण न्यायालयाचा रस्ता धरतात. त्यामुळे किमान सारूळ प्रश्नी तरी पैशांचा जोर अन् साराच घोळ, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा:

Back to top button