पिंपरी : रेड झोनमध्ये बांधले टॉयलेट; नागरिक व पालिका प्रशासनाला वेगळा नियम? | पुढारी

पिंपरी : रेड झोनमध्ये बांधले टॉयलेट; नागरिक व पालिका प्रशासनाला वेगळा नियम?

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस स्थानकात स्मार्ट टॉयलेट व दुकाने बांधण्यात आली आहेत. हे बांधकाम प्रतिबंधित रेडझोन क्षेत्रात करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांच्या घरांवर कारवाई करणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वत: या प्रकारचे बांधकाम केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी निगडीच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेत आणि स्मार्ट सिटी कार्यालयाकडे सोमवारी (दि.7) तक्रार केली आहे. रेड झोनमध्ये बांधकाम करता येत नाही. बांधकाम केल्यास पालिका प्रशासनाकडून कारवाई करून ते पाडण्यात येते.

मात्र, पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने पालिकेच्या बस स्थानकावर थेट स्मार्ट टॉयलेट व गाळ्याचे बांधकाम केले आहे. या कृतीतून स्मार्ट सिटीने पालिकेचे नियम पायदळी तुडविले आहेत. या संदर्भात स्मार्ट सिटी, महापालिका आयुक्त, अतिक्रमण विभाग, बांधकाम परवानगी विभाग, फ क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करूनही उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. ते बांधकाम तत्काळ न पाडल्यास आंदोलनाचा इशारा काळभोर यांनी दिला आहे.

लोकांच्या सोयीसाठी तात्पुरती सुविधा निर्माण केली आहे
शहरातील नागरिकांच्या सोईसाठी विमानतळाच्या धर्तीवर स्मार्ट टॉयलेट पीपीपी तत्वावर बांधण्यात येत आहेत. त्यात स्लॅम व कॉलम काही नाही. रोड साईड फर्निचर स्वरूपात एक टॉयलेट निगडीत बांधले आहे. त्यासाठी पालिकेने एक पैसाही खर्च केलेला नाही. देखभाल, सुरक्षा व स्वच्छतेचे काम संबंधित ठेकेदार करणार आहे. उत्पन्न मिळावे म्हणून तेथे त्याला काही गाळे देण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया राबवून शहरातील वेगवेगळ्या भागांत हे टॉयलेट उभारण्यात येत आहेत, असे पिंपरी-चिंचवड सिटीचे महाव्यवस्थापक मनोज सेठिया यांनी सांगितले.

 

Back to top button