नाशिक : बाजार समितीत व्यापार्‍यांवर शस्त्राने हल्ला | पुढारी

नाशिक : बाजार समितीत व्यापार्‍यांवर शस्त्राने हल्ला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती हमालांमध्ये वाद झाल्याने त्यात मध्यस्थी करणार्‍या दोघा भाजीपाला व्यापार्‍यांवर हमालांनी शस्त्राने हल्ला केला होता व कार्यालयाचीदेखील तोडफोड केल्याने बाजार समितीच्या आवारात व्यापारी आणि शेतकरी यांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. 15) सायंकाळी बाजार समिती परिसरातील अंबिका व्हेजिटेबल कंपनीबाहेर काही हमालांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. यात बबलू भल्ला (पंजाबी) याला काही संशयतांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी भाजीपाला व्यापारी मंगेश लहामगे आणि उमेश गाडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी थेट व्यापार्‍यांवर तीक्ष्ण हत्यार्‍याने वार केले. त्यानंतर संबंधित भाजीपाला व्यापार्‍याच्या कार्यालयाचीदेखील तोडफोड करत मोठे नुकसान केले आहे. या हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. मात्र, पोलिस येत असल्याचे समजताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेतील काही संशयितांची नावे समोर आली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

‘सीसीटीव्ही वाढविणे गरजेचे’
गरजेपेक्षा जास्त सुरक्षारक्षक असल्याचे सांगत सुरक्षारक्षक कमी करून बाजार समितीच्या तिजोरीत भर पडली असल्याचे चित्र रंगवले गेले. दिंडोरी रोडवरील बाजार समिती परिसर असो की शरदचंद्र पवार मार्केट यार्ड या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम नसल्याने गुन्हेगारी तसेच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली बघायला मिळते.

हेही वाचा:

Back to top button