शासन आपल्या दारी : खासदार हेमंत गोडसेंना शह देण्याची चर्चा | पुढारी

शासन आपल्या दारी : खासदार हेमंत गोडसेंना शह देण्याची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘शासन आपल्या दारी’अंतर्गत गिरणारेत शनिवारी (दि.15) खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या शिबिराला स्थगिती देण्याची मागणी देवळाली येथील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्रातून केली आहे. वैद्यकीय कारण पुढे करत उपस्थित राहता येणार नसल्याचे अहिरे यांनी पत्रात नमूद केले असले तरी एक प्रकारे खा. गोडसेंना शह देण्याचा हा प्रकार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

राज्यातील जनतेसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबविते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी शासन आग्रही असते. त्यामुळे स्थानिक स्तरावर ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत स्थानिक पातळीवर शिबिरांचे आयोजन करताना लाभार्थ्यांना जागेवर योजनांचा लाभ दिला जातो. त्यानुसार खा. गोडसे यांनी शनिवारी (दि.15) गिरणारे येेथील लक्ष्मी लॉन्समध्ये शिबिराचे आयोजन केले. शिबिरातून परिसरातील गोरगरीब जनतेला एकाच छताखाली योजनांचा लाभ देणे हा त्यामागील उद्देश होता. मात्र, हे शिबिर होण्यापूर्वीच ते वादात अडकले आहे. त्याचे कारण म्हणजे आ. अहिरे यांनी शिबिर रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेले पत्र आहे.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना 2 ऑक्टोबरला पाठविलेल्या पत्रात वैद्यकीय कारण देत शिबिर स्थगित करण्याची मागणी अहिरे यांनी केली आहे. अहिरेंच्या पत्रावर जिल्हाधिकार्‍यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, अहिरेंचे शिबिर स्थगितीचे हे पत्र म्हणजे शिंदे गटात सामील झालेले खा. गोडसे यांच्यासाठी काटशह मानला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात शिबिरावरून गोडसे विरुद्ध आ. अहिरे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा:

Back to top button