इंदापूर : तोपर्यंत कालव्यास हात लावू देणार नाही; अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांचा इशारा | पुढारी

इंदापूर : तोपर्यंत कालव्यास हात लावू देणार नाही; अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांचा इशारा

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण करून कोणीही आमचे पाझराचे पाणी बंद करू शकत नाही. जोपर्यंत खडकवासल्याचे 3.9 टीएमसी पाणी सणसर कटमधून निरा डावा कालव्यास मिळत नाही तोपर्यंत कालव्यास कोणालाही हात लावू देणार नाही, असा इशारा अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी दिला. निरा डावा कालवा अस्तरीकरणाविरोधात गुरुवारी (दि. 13) निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे इंदापूर- बारामती रस्त्यावर शेतकरी कृती समितीने रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी यादव बोलत होते यादव म्हणाले, शेतकर्‍यांना विश्वासात न घेता बळजबरीने कालव्याचे अस्तरीकरण सुरू केले आहे.

अस्तरीकरण तर सोडाच, पण आता आम्ही मुरमीकरणसुद्धा होऊ देणार नाही. अस्तरीकरणाऐवजी कालव्याचे रुंदीकरण करावे, तेही खडकवासल्याचे पाणी मिळाल्यानंतर. अ‍ॅड. शशिकांत शेंडे म्हणाले, निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण करून शेतकर्‍यांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. अ‍ॅड. श्रीकांत करे म्हणाले, शेतकर्‍यांच्या हक्काचं पाझराचे पाणी उद्योगपतींना देण्याचे नियोजन आहे. माणिक भोंग म्हणाले, अस्तरीकरण झाल्यास या भागातील शेती उद्ध्वस्त होईल.

संतोष मोरे यांनी, अस्तरीकरणाबाबत आमदार व विरोधक काहीच का बोलत नाहीत, असा सवाल केला. अ‍ॅड. संदीप शेंडे व अमोल शिंदे यांनीही अस्तरीकरणाला विरोध केला. यावेळी वरकुटे खुर्दचे माजी सरपंच शिवाजी यादव, निमगाव केतकीचे माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, पांडुरंग हेगडे, शेतकरी संघटनेचे मंगेश घाडगे, शिवसेनेचे बबन खराडे, अ‍ॅड. सचिन राऊत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता अश्विन पवार व शाखा अभियंता आर. डी. झगडे यांनी या वेळी निवेदनाचा स्वीकार केला.

Back to top button