नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी

वणी : दादागिरी करत बसचालकावर हल्ला करणाऱ्या तरूणास ताब्यात घेताना शीघ्र कृती दलाचे जवान. (छाया : अनिल गांगुर्डे)
वणी : दादागिरी करत बसचालकावर हल्ला करणाऱ्या तरूणास ताब्यात घेताना शीघ्र कृती दलाचे जवान. (छाया : अनिल गांगुर्डे)

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

वणीत नाशिक-कळवण बसला स्विफ्ट कार आडवी लावून बसचालकावर दादागिरी करत नशेत असलेल्या कारचालकाने बसचालकाच्या हातावर चाकूने वार करत जखमी करण्याचा प्रकार घडला.

बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान कळवण आगाराचा बसचालक अनुप खैरनार (३८) हे नाशिक-कळवण बस कळवणकडे घेऊन चालले होते. कृष्णगाव येथे काही प्रवाशांना उतरवून वणीकडे येत असताना बस शंखेश्वर मंदिराजवळ येताच पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कार (एमएच १५ एचएच ४८७१) मधून महेंद्र प्रभाकर पाटील (उपेंद्रनगर, अंबड) याने कार आडवी लावत बस थांबवून बसचालकाशी दादागिरी केली. दोघांत बाचाबाची झाली असता महेंद्र पाटीलने कारमधून धारदार चाकू काढत अनुप खैरनार यांच्यावर वार केला. खैरनार यांनी हाताने शस्त्र पकडल्याने त्यांची बोटे कापली गेली. बसवाहक दिगंबर कवर सोडवायला गेले असता त्याच्या अंगठ्यालाही शस्त्र लागल्याने हात रक्तबंबाळ झाला. सुदैवाने त्यादरम्यान वणीकडून नाशिककडे जात असलेल्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी कारचालकास तत्काळ जागेवर शस्त्रासह जेरबंद केले. कारचालक नशेत असल्याने कोणालाच ऐकत नव्हता. वणी पोलिस ठाण्याचे सपोनि स्वप्निल राजपूत यांनी महेंद्र पाटील याला अटक केली असून, अनुप खैरनार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news