वाढत्या नागरीकरणाने चिखलीतील समस्यांत वाढ | पुढारी

वाढत्या नागरीकरणाने चिखलीतील समस्यांत वाढ

चिखली : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत वाढलेले नागरीकरण आता चिखली भागाच्या मुळावर येऊ लागले आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे चिखली भागात समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या गतीने नागरीकरण वाढत आहे, त्या तुलनेत पायाभूत सुविधांमध्ये वाढ मात्र होत नसल्याने पुढील काळात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अनधिकृत बांधकामे, संयुक्त उपक्रम (जॉईंट व्हेन्चर) तत्त्वावर सुरू असलेली बांधकामे आणि बिल्डर्सच्या मोठ्या स्कीम यामुळे नागरीवस्त्या या भागात वाढू लागल्या आहेत. जुन्या काळात स्थानिकांनी जमिनी गुंठा, दोन गुंठे करत विकल्या आणि तत्कालीन वेळेच्या अनुषंगाने बांधकामे करण्यात आली होती. परंतु, मनपा हद्दीत गावे समाविष्ट झाल्यावर या भागाचा चेहरामोहरा बदलू लागला आणि कालांतराने अनधिकृत बांधकामांचे पीक या भागात वाढायला सुरुवात झाली.

ज्या गुंठा दोन गुंठा जमिनींवर दोन तीन खोल्या होत्या, त्या ठिकाणी इमारत बांधून पन्नास खोल्या काढून भाडेकरू म्हणून खोल्या देण्याचा व्यवसायच या भागात सुरू झाला. पर्यायाने ड्रेनेज लाईन, पाणी, वीजपुरवठा करणार्‍या यंत्रणा या सगळ्या आजच्या तारखेला ओव्हरलोड आहेत. त्याचा परिणाम दिसत असून, अनेक भागात रस्ते, पाणी, वीज ड्रेनेज लाईन चोकअप या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. आता हे चक्र पुढच्या पायरीला गेले असून शेकडो फ्लॅट असलेल्या मोठमोठ्या बिल्डर स्कीम या भागात येत असल्याने पायाभूत सुविधा नागरिकांना द्यायला पुढील काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाहतूक समस्यांनी या भागातील नागरिक त्रस्त आहेत आणि दरदिवशी सकाळी तसेच सायंकाळी थरमॅक्स चौक ते चिखली-देहू रस्ता या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. रस्त्याच्या वाढीच्या मर्यादा संपल्या असल्याने पुढील काळात वाहतूक कोंडीवर मार्ग काढणे हे मोठे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. गावे ही गावेच राहिली असती तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया स्थानिकांची आहे. तर, ज्यांनी शांतीने आयुष्य जगता येईल या भावनेने घरे बांधली, त्यांनाही अशांती शिवाय काहीही हाती लागले नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

 

चिखलीचा महापालिकेत समावेश झाल्यापासून संपूर्ण परिसराच्या विकासाला प्र्राधान्य मिळालेला नाही. पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात मनपा कमी पडत असून याकरिता प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.
                                                            -किशोर तेलंग, रहिवासी

रस्ते, पाणी आणि अन्य सुविधांची कुदळवाडी भागात निर्मिती केली जाणे गरजेचे आहे. शहराच्या हद्दीत असूनही आजही ग्रामीण भागापेक्षा बिकट अशी अवस्था आहे. याबाबत उपाययोजना आवश्यक आहेत.
                                                             – जावेद मुजावर, व्यावसायिक

कस्तुरी मार्केट ते साने चौक भागापर्यंत असलेल्या अतिक्रमण आणि अन्य समस्यांना सोडवायला प्रस्ताव देण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांत वाहतूक समस्या बर्‍याच अंशी कमी होण्याचा विश्वास आहे. तसेच अन्य काही पायाभूत सुविधांची कामे पिंपरी मुख्य कार्यालयामार्फत सुरू असून, त्याबाबत विस्तृत माहिती त्या-त्या विभागांतील अधिकारी देऊ शकतील.
                                                – सीताराम बहुरे, फ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी

Back to top button