अविष्कार २०२२ : संशोधनातून समाजाला विज्ञानाधिष्ठीत करणे गरजेचे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून समाजाला विविध संशोधनातून शिक्षित करून विज्ञानाधिष्टीत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अशोक बोऱ्हाडे यांनी केले.
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात अविष्कार २०२२ विज्ञान संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.विजय मेधने, डॉ.सोपान एरंडे, प्रा.दिलीप जाधव डॉ. कैलास लभडे आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे १२२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ६१ प्रकल्प सादर केले. यामध्ये शेती, ऊर्जा, भौतिकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण, वाणिज्य व व्यापार तर कला विभागातील विद्यार्थ्यांनी भाषा, संभाषण, राज्यशास्त्र आदी विषयांवर आधारित प्रकल्प सादर केले. यावेळी मनोगतातून डॉ. सोपान एरंडे यांनी संशोधनाचे महत्व अधोरेखित केले. डॉ. लभडे यांनी प्रास्ताविकातून अविष्कार स्पर्धेची माहिती दिली. डॉ. मनीषा आहेर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अविनाश काळे यांनी आभार मानले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रकल्पांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.