कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोडणार नाही: आमदार कुणाल पाटील | पुढारी

कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोडणार नाही: आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील अनेक कामे शिंदे सरकारने स्थगित केली आहेत. मात्र, तालुक्याचा विकास व्हावा, म्हणून निधीसाठी संघर्षही करण्याची आपली तयारी आहे. कोणतीही शक्ती आपला विकास थांबवू शकणार नाही. आम्ही तीन पिढ्यापासून काँग्रेस पक्षाची निष्ठेने सेवा करत आलो आहोत. आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. कितीही त्रास आणि विरोध सहन करावा लागला तरी चालेल, परंतू आम्ही कधीही काँग्रेसला सोडून जाणार नाही, असे काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी आज (दि.११) येथे स्पष्ट केले.

धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते धाडरे येथील बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या पुलासाठी ४ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या पुलामुळे आर्वीपासून ते शिरुडपर्यतच्या धाडरा, धाडरी, कुळथे या परिसरातील गावांची सोय होणार आहे.

आमदार कुणाल पाटील म्हणाले की, दिवंगत माजी खा. चुडामण आण्णा, माजी मंत्री रोहिदास पाटील आणि मी अशा आमच्या तीन पिढ्या काँग्रेस पक्षात एकनिष्ठपणे राहिल्या आहेत. आमच्या रक्तातच काँग्रेस पक्ष असल्याने कधीही काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही. कितीही विरोध झाला आणि त्रास सहन करावा लागला, तरीही काँग्रेस हेच आपले शेवटपर्यंत ध्येय राहिल.

सामान्य जनता महागाईला, दडपशाहीला कंटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे देशात परिवर्तन होत आहे. राज्यात आणि देशात परिवर्तनाची लाट आली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी पं. स. सभापती भगवान गर्दे, कार्यकारी अभियंता घुगरी, माजी सरपंच संतोष पाटील, सरपंच धनुबाई अहिरे, माजी सरपंच राजेंद्र पाटील, सुतगिरणी संचालक पंढरीनाथ पाटील, बापू खैरनार, आर्वी सरपंच नागेश देवरे, सामाजिक कार्यकर्ते शशी रवंदळे, अ‍ॅड. बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button