नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान | पुढारी

नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यात प्रथम क्रमांक आला, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे, हा प्रमुख उद्देश आहे. या अंतर्गत बाजार समितीच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मूल्यांकन करून राज्यभरातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे अपेक्षित होते. त्यानुसार पणन संचालनालय, शासनाच्या स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषी पणन) यांच्यामार्फत बाजार समित्यांमधील पायाभूत व इतर सेवासुविधा निकषांसाठी 80 गुण, आर्थिक निकषांसाठी 35 गुण, वैधानिक कामकाज निकषांसाठी 55 गुण व इतर निकषांसाठी 30 गुण असे एकूण 200 गुण निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने ठरवून दिलेल्या गुणांकनानुसार, लासलगाव बाजार समितीच्या सन 2021-22 या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पाहणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड यांच्या कार्यालयाने करून वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव पणन संचालनालयातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर केला होता. त्याप्रमाणे प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने या प्रस्तावाची छाननी करून सन 2021-22 या वर्षाच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव बाजार समितीस एकूण 200 गुणांपैकी 163 गुण देऊन राज्यस्तरीय क्रमवारीत प्रथम क्रमांक दिला आहे.

अमृतमहोत्सवी वर्ष पार केलेल्या लासलगाव बाजार समितीने गेल्या 75 वर्षांत शेतकरी व इतर बाजार घटकांसाठी उभारणी केलेल्या विविध पायाभूत सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजना व उपक्रम यातील कामगिरी उल्लेखनीय असल्याने स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख तथा राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने लासलगाव बाजार समितीस प्रथम क्रमांकाचे मानांकन निश्चित केल्याचे बाजार समितीस कळविण्यात आले आहे.

लासलगाव बाजार समितीने शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्गाशी समन्वय साधून अमावास्या, शनिवार व इतर शासकीय सुट्यांच्या दिवशी लिलावाचे कामकाज सुरू केल्यामुळे वर्षभरात लिलावाचे कामकाज वाढले आहे. तसेच उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीमाल लिलावासाठी मुख्य व उपबाजार आवारांवर भव्य लिलाव शेडची उभारणी करून ऐन कोरोना कालावधीत शेतकर्‍यांना पिशवी मार्केटच्या माध्यमातून कांदा विक्रीची सुविधा निर्माण करून दिली होती. तसेच खानगाव नजीक येथे फळे व भाजीपाला लिलाव सुरू करून, शेतकर्‍यांना पर्याय उपलब्ध करून दिले, असेही जगताप यांनी सांगितले. तसेच शेतकरी तसेच संबंधित सर्व घटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे जगताप यांनी सांगितले.

शासकीय सुट्यांच्या दिवशी लिलावाचे कामकाज सुरू केल्यामुळे वर्षभरात लिलावाचे कामकाज वाढले आहे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीमाल लिलावासाठी मुख्य व उपबाजार आवारांवर भव्य लिलाव शेडची उभारणी करून ऐन कोरोना कालावधीत शेतकर्‍यांना पिशवी मार्केटच्या माध्यमातून कांदा विक्रीची सुविधा निर्माण करून दिली. फळे व भाजीपाला लिलाव सुरू करून, शेतकर्‍यांना पर्याय उपलब्ध करून दिले, सर्व घटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत.
– सुवर्णा जगताप, सभापती,
बाजार समिती लासलगाव

बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये लासलगावने प्रथम क्रमांक पटकावला असून, बाजार समितीच्या या यशात बाजार समितीचे सर्व सदस्य मंडळ तसेच सहकार व पणन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी व इतर सर्व मार्केट घटकांचा मोलाचा वाटा आहे. वार्षिक क्रमवारीत प्राप्त केलेल्या प्रथम क्रमांकाचे स्थान कायम राखण्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहेत.
– नरेंद्र वाढवणे, सचिव,
बाजार समिती लासलगाव

हेही वाचा :

Back to top button