Nashik : संभाजीराजेंना विरोध करणार्‍यांविरोधात नाशिकमध्ये निदर्शने

Nashik : संभाजीराजेंना विरोध करणार्‍यांविरोधात नाशिकमध्ये निदर्शने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत विशिष्ट समन्वयकांना झुकते माप देऊन छत्रपती संभाजीराजे यांनी सकल समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा समाजातील काही मंडळींनी केला होता. विशेषत: संभाजीनगरमधील काही समन्वयकांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वावरच अविश्वास दर्शविला होता. यामुळे संभाजीराजे यांचे समर्थक संतप्त झाले असून, विरोध करणार्‍यांविरोधात निदर्शने करण्यात आली. सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करीत संभाजीराजे यांना समर्थन देण्यात आले.

संभाजीराजे यांच्या नेतृत्वावर टीका करणारे टोळके कोणत्यातरी राजकीय पक्षाची दलाली करीत असल्याचा आरोपही यावेळी समर्थकांकडून करण्यात आला. तसेच बैठकीला उपस्थित नसलेल्या मंडळींनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीचा वृत्तांत सांगणे हास्यास्पद असून, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेचा विपर्यास करून समाजाची दिशाभूल करण्याचा नाठाळपणा या मंडळींकडून सुरू आहे. या बैठकीत बोलू दिले नाही, हा आरोप धादांत खोटा असून, प्रत्येक समन्वयकाने आपली भूमिका शांततेत मांडावी, अशी छत्रपतींची भूमिका होती. दलाली करणार्‍या टोळक्यांनी आपल्या नेत्याला खूश करण्यासाठी छत्रपतींच्या गादीला बदनाम करून मराठी समाजाची दिशाभूल करीत क्रांती मोर्चाचे नेतृत्व हायजॅक करण्याचा अयशस्वी खटाटोप सुरू केल्याचेही समर्थकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मराठा समाज सुज्ञ आणि जाणकार असल्याने त्या टोळक्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. समाजाचा छत्रपतींच्या नेतृत्वावर गाढा विश्वास असून, संभाजीराजेच मराठा समाजाला न्याय देतील ही खात्री असल्याचेही समर्थकांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे सुनील बागूल, करण गायकर, गणेश कदम, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, संतोष माळोदे, विजय खर्जुल, आशिष हिरे, विलास जाधव, बंटी भागवत, प्रमोद जाधव, सोमनाथ जाधव, रुपेश नाठे, सचिन पवार, योगेश गांगुर्डे, अस्मिता देशमाने आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

'एक मराठा, लाख मराठा'
या निदर्शनादरम्यान 'छत्रपती के सन्मान में मराठा मैदान में, जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा' या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तसेच मराठा समाजाचे नेतृत्व केवळ राजे आणि राजेच करू शकतात. त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची ताकद कुठल्याही दलाल टोळक्यात नाही, असा सूरही यावेळी व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news