Eknath Khadse: भाजपमध्ये जुन्यांना डावलून नव्यांना संधी; खडसेंनी नाशिकमध्ये मांडली व्यथा | पुढारी

Eknath Khadse: भाजपमध्ये जुन्यांना डावलून नव्यांना संधी; खडसेंनी नाशिकमध्ये मांडली व्यथा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघावर नेमण्यात आलेल्या प्रशासकाची नियुक्ती अवैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिला. हा निर्णय म्हणजे न्यायालयाची राज्य सरकारला चपराक असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली. भाजपमध्ये जुन्यांना डावलून नव्यांना संधी दिली जात असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली.

आ. खडसे हे मंगळवारी (दि. 30) नाशिक दौर्‍यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघावर राज्य सरकारने बेकायदेशीरपणे प्रशासक मंडळ नियुक्त करताना खोेट्या चौकशाही सुरू केल्या. पण, न्यायालयाचा निर्णय म्हणजे अन्यायाविरोधात न्याय असल्याची भावना आ. खडसे यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये वर्षानुवर्षे काम करणार्‍या नेत्यांना पक्ष नेतृत्वाकडून बाजूला सारले जात आहे. पण, त्यांच्या जागी नव्याने संधी दिलेल्या नेत्यांचे योगदान बघितलेदेखील जात नसल्याची टिप्पणी आ. खडसेंनी केली.

शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांच्या राज्यातील सत्तासंघर्षावर पुढील पाच वर्षेे निकाल येणार नाही, या वक्तव्याचा समाचार घेताना आ. खडसे यांनी न्यायालयावर टिप्पणी करणे योग्य नसल्याचे सांगितले. शिवसेनेसंदर्भात दाखल याचिकेवर न्यायालयात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, हे बघणे महत्त्वाचे आहे. घटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार सुनावणी झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास आ. खडसे यांनी व्यक्त केला.
शेवटी निर्णय मुंडे घेतील

भाजपमध्ये पंकजा मुंडे या अस्वस्थ असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांनी त्यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. पण, एवढ्या वर्षांपासून पंकजाताई पक्षात काम करत असल्याने त्या असा काही निर्णय घेतील, असे वाटत नसल्याचे सांगताना, शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असेही आ. खडसे म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button