भारीच की ! भावापर्यंत सुरक्षित पोहोचणार राखी, टपाल खात्याची मस्त आयडीया | पुढारी

भारीच की ! भावापर्यंत सुरक्षित पोहोचणार राखी, टपाल खात्याची मस्त आयडीया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थात, रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरापासून दूर असलेल्या आपल्या लाडक्या भाऊरायाला राख्या पाठविण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय टपाल विभागामार्फत विशेष राखीच्या पाकिटांमधून स्पीड पोस्टद्वारे राखी पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे. पाकिटे वॉटरप्रूफ असल्याने भाऊरायांपर्यंत बहिणीची राखी सुरक्षित पोहोचणार आहे.

भाऊ-बहिणीचे अतूट नाते कायम ठेवण्यासाठी तसाच ग्राहकांसोबत तितकेच अतूट नाते असणार्‍या टपाल खात्याद्वारे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या वर्षी ‘राखी मेल्स डिलिव्हरी बॅग’ उपक्रमाच्या माध्यमातून कमी वेळेत राख्या इच्छितस्थळी पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले होते. तर यंदा वॉटरप्रूफ पाकिटे पोस्टाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या विशेष पाकिटाची किंमत केवळ 10 रुपये असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.

आजच्या डिजिटल शुभेच्छांच्या युगामध्ये टपालाद्वारे प्रत्यक्ष रूपाने राखीच्या माध्यमातून भावंडांना बहिणींचे प्रेम प्राप्त होते आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. भावासाठी अतिशय प्रेमाने घेतलेली व त्याच प्रेमाने व स्नेहासहित टपाल खात्याच्या या विशेष पाकिटाद्वारे पाठविलेल्या राखीचा आनंद अवर्णनीय आहे. प्रत्येक भावापर्यंत आपल्या बहिणीची राखी वेळेत पोहोचावी, यासाठी टपाल खात्याने विशेष योजना आखली आहे. त्यामुळे बहीण-भावाचे नाते अतूट राहणार आहे.

सर्व टपाल कार्यालयांना राखीचे टपाल शीघ—तेने वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा वॉटरप्रूफ पाकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे राखी सुरक्षितपणे भावांपर्यंत पोहोचविली जाईल. जिल्ह्यातील ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन सहकार्य करावे.
– मोहन अहिरराव,
प्रवर अधीक्षक (नाशिक)

पाकिटांच्या मागणीत वाढ

प्रत्येक वर्षी पोस्टाच्या राखीच्या पाकिटांची मागणी वाढतच आहे. ग्राहक स्पीड पोस्टाद्वारे राखी पाठवू शकतात. परदेशातही राखी वेळेवर पोहोचविली जाईल. या पाकिटांवर ‘राखी’ या शब्दाचा उल्लेख केला असल्याने इतर टपालांमधून त्यांचे वर्गीकरण करणे सोपे झाल्याचे टपाल खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button