नाशिक : पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू ; पाच गेले वाहून | पुढारी

नाशिक : पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू ; पाच गेले वाहून

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य पाच व्यक्ती वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पेठमध्ये भिंत कोसळून पाच जण जखमी झाले आहेत. वाहून गेल्याच्या घटना या शिलापूर, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबक परिसरातील आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

 

सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथील सुरेश आबाजी कडाळी (25) व विजय पांडुरंग वाघमारे (23) हे सोमवारी रात्री प्रभाकर त्र्यंबक पवार (28) यांच्यासह काही कामानिमित्त बुबळी येथे गेले होते. रात्री 11 च्या सुमारास घरी परतत असताना जामणेमाळ जवळील फरशी पुलावरून त्यांची पाण्यात पडली, त्यात कडाळी व वाघमारे वाहून गेले. पवार सुदैवाने बचावले. या दोघांचा शोध सुरू आहे.

त्र्यंबक तालुक्यात जोरदार पावसामुळे रविवारपासून आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या घटनांत एकाचा बुडून मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत. रविवारी (दि. 10) हरसूल भागातील धायटीपाडा येथे नाल्यात पाय घसरून पडल्याने नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कृष्णा लक्ष्मण गभाले (45) असे त्यांचे नाव असून, ते पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात पाय घसरून पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत तळेगाव-त्र्यंबक येथील पोपट रामदास गांगुर्डे 11 जुलैपासून बेपत्ता आहे. तो किकवी नदीत वाहून गेला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या मदतीने पोलिस गांगुर्डे यांचा शोध घेत आहे. अंजनेरी येथील जवळच्या पाझर तलावात सोमनाथ छबन नाबेडे (32 वर्ष) हे मोटार दुरुस्त करण्यासाठी उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. सोमनाथ नाबेडे सोबत आणखी दोन व्यक्ती असे तिघे इलेक्ट्रिक मोटार दुरुस्ती करणारे कारागीर हे गणेशगाव वाघेरा येथील आहेत. अंजनेरीच्या शेतकर्‍याने त्यांना मोटार दुरुस्तीसाठी आणले होते व त्यांना पाझर तलावात उतरवले. मात्र, त्यापैकी दोघे बाहेर येण्यास यशस्वी झाले व सोमनाथ पाण्यात बुडाला. स्थानिक नागरिक व पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पेठमध्ये भिंत कोसळून पाच व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्र्यंबकेश्वर व मालेगाव तालुक्यांमध्ये दोन गायी व प्रत्येकी एक बैल, म्हैस व वासरू दगावले आहेत. तसेच जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शिलापूर (ता. नाशिक) येथे एका बालकाचा बुडून मृत्यू झाला. दिंडोरी येथील सहावर्षीय बालिका आळंदी नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे देवळ्यातील दोन व सुरगाण्यातील तीन रस्त्यांवरून पाणी वाहते आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.12) हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. याशिवाय दिंडोरीतील 8 रस्ते पाण्याखाली असून, एका ठिकाणी दरड कोसळली आहे. पेठमधील 6 रस्ते पाण्याखाली तसेच 4 रस्ते खचले असून, दोन ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडल्या. निफाड तालुक्यातही 3 ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. या सर्व ठिकाणची वाहतूक स्थानिक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे 11 तालुक्यांतील 92 घरांचे अंशत: तर एका घराचे पूर्णत: नुकसान झाले आहे. कळवण व देवळ्यात अनुक्रमे 2 व एका गोठ्याचे नुकसान झाले. याशिवाय विहिरीची भिंत पडणे, शाळेची संरक्षक भिंत पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button