मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रपती निवडणुकीनंतर | पुढारी

मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रपती निवडणुकीनंतर

मुंबई : दिलीप सपाटे राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपची सत्ता येऊन आता बारा दिवस झाल्याने सर्वांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. मात्र राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला असून आता पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर लगेच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगण्यात आले होते. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी 12 तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे संकेत दिले होते. त्यासाठी शिंदे गटातील आणि भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र 12 तारीख झाली तरी मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नसल्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. आता हा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल अशी चर्चा दोन्ही बाजूच्या आमदारांमध्ये आहे. मात्र, भाजपश्रेष्ठींनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 18 जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतरच घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणूक रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी एनडीएच्या घटक पक्षांची नवी दिल्लीत 13 जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिंदे गटाकडून केसरकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह शिंदे गटाचे अन्य आमदारही या बैठकीला उपस्थित राहतील, असे केसरकर यांनी सांगितले.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार असल्याने 16 आणि 17 जुलै रोजी या निवडणुकीबाबत संसद सदस्य आणि आमदारांना मतदानाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये सर्व सदस्य व्यग्र असतील. मंत्र्यांच्या शपथविधी तयारीसाठी सध्यातरी वेळ नाही आणि कोणालाही घाई नाही, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

14 जुलै रोजी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या समर्थन मिळविण्यासाठी मुंबईला भेट देणार आहेत. त्या भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसोबत बैठका घेतील. त्यामुळे उद्यापासून 18 जुलैपर्यंत राष्ट्रपती निवडणुकीचीच धामधूम असणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार बाजूला ठेवण्यात आला आहे.

द्रौपदी मुर्मू उद्धव ठाकरेंना भेटणार का?

द्रौपदी मुर्मू यांच्या मुंबई दौर्‍याच्या रूपाने भाजप आणि शिवसेेनेत निर्माण झालेला कडवटपणा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 14 तारखेला मुंबई भेटीवर येणार्‍या मुर्मू या विमानतळा शेजारी असलेल्या ललित हॉटेलमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार, खासदारांशी संवाद साधणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदासाठी त्यांना मंगळवारी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे खासदार आणि आमदारही त्यांना मतदान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मू या उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मातोश्रीवर जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला असता तेदेखील मातोश्रीवर गेले होते. मात्र, भाजप आणि उद्धव ठाकरे यांचे ताणले गेलेले संबंध पाहता मुर्मू मातोश्रीवर जाण्याची शक्यता नसली तरी शिवसेना आमदार, खासदारांना त्या भेटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button