शालेय पोषण आहाराची नियमितपणे तपासणी करावी : खासदार डॉ. सुभाष भामरे | पुढारी

शालेय पोषण आहाराची नियमितपणे तपासणी करावी : खासदार डॉ. सुभाष भामरे

धुळे; पुढारी वृत्तसेवा: शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची नियमित तपासणी करावी. त्यासाठी भरारी पथके नियुक्त करावीत, असे निर्देश खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी २५ जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या बैठकीत उर्वरित विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले, शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार समतोल, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावा. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्याचा नियमितपणे अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी जनजागृती करावी. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थ्यांना तातडीने जोडण्या द्याव्यात. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत- जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. अटल पेन्शन योजनेत अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सर्व शिक्षा अभियान, शालेय पोष्ज्ञण आहार, बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियान, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, पायाभूत सोयीसुविधा, राष्ट्रीय महामार्ग, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रा. अरविंद जाधव यांनी सहभाग घेतला. यावेळी विविध विभागांचे प्रमुख, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button