Nashik Igatpuri : पावसाच्याच तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता कायम | पुढारी

Nashik Igatpuri : पावसाच्याच तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता कायम

नाशिक (घोटी): पुढारी वृत्तसेवा
उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणार्‍या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाने काहीशी ओढ दिल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आर्द्रा व मृग नक्षत्र पूर्णत: कोरडेठाक गेल्याने शेतीच्या कामांना विलंब झाला, तर बहुतांश ठिकाणी पेरणीची कामेही रखडली. गेल्या तीन चार दिवसांपासून रोज अर्धा पाऊण तास झालेल्या पावसाने तालुक्यातील शेतीला काहीसा दिलासा मिळाला असला तरी तुलनेने दमदार पाऊस नसल्याने नाराजीचा सूर आहे.

पावसाच्याच तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने चिंतेचा विषय झाला आहे. तालुक्यात पश्चिम पट्ट्यात उपलब्ध पाण्यावर आधारित शेतकर्‍यांनी पेरणी केली. त्यामुळे जून मध्यापर्यंत पाऊस न झाल्याने पेरणी वाया जाण्याची भीती निर्माण झाली. तसेच दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली होती. खते, बियाणांची महागाई, विक्रेत्यांकडून होणारी पिळवणूक, खते देण्यास होणारी टाळाटाळ व शेतकर्‍यांच्या माथी पर्यायी खते, बियाणांचा भार यामुळे ते हतबल झाले होते. दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांपासून वळीवसद़ृश पाऊस होत असल्याने शेतकरीवर्गाला काहीसा दिलासा मिळत आहे. तरी पूर्व भागात अद्यापही दमदार व पेरणीयुक्त पाऊस न झाल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इगतपुरीसारख्या पावसाच्या तालुक्यात या थोड्याफार पावसाचा काय उपयोग, असा सवाल व्यक्त केला जातो.

कृषीविषयी मार्गदर्शनाची गरज
या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी, भेडसावणार्‍या समस्या याबाबत कृषी विभागाने सक्रिय होऊन दिलासा देऊन कृषीविषयक मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तसेच खते, बियाणांच्या उपलब्धतेबाबतही तसेच दराबाबतही विक्रेत्यांना सूचना देण्याची गरज असल्याचे शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे. याबरोबरच खरीप हंगामाच्या बाबतीत घोटीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आमदार, लोकप्रतिनिधी तसेच कृषी विभाग व शेतकरी यांच्यात बैठक घेऊन शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी व समस्या सोडवणुकीच्या द़ृष्टीने तातडीने पावले उचलण्याबाबतची मागणी शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button