नाशिक : दातलीत रंगला पहिला रिंगणाचा अनुपम सोहळा (Photo) | पुढारी

नाशिक : दातलीत रंगला पहिला रिंगणाचा अनुपम सोहळा (Photo)

दातली (जि. नाशिक) : शरद शेळके

या सुखा कारणे देव वेडावला ।
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला ॥
शाश्वत सुखाचा आनंद देणारा स्वर्गालाही लाजवेल असा गोल रिंगणाचा अनुपम सोहळा दातली येथे पार पडला. कोरोनामुळे गेली दोन वर्षे विठुरायाचे दर्शन न घेऊ शकलेल्या वारकर्‍यांनी मोठ्या भक्तिभावात हा डोळे दिपवणारा क्षण ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. हजारो वैष्णवांनी हा नयनरम्य रिंगण सोहळा लक्ष लक्ष नेत्रांनी साठवून घेतला. सायंकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडला आणि संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी मुक्कामी खंबाळेकडे मार्गस्थ झाली.

लोणारवाडी येथील मुक्काम आटोपल्यावर पालखीचे प्रस्थान सिन्नरनगरीतून कूच करत कुंदेवाडी, मुसळगाव आणि नंतर दातली गावी रिंगण स्थळाकडे सकाळपासूनच मोठ्या संख्येने वारकर्‍यांचा ओघ सुरू होता. सकाळपासूनच वारकर्‍यांची रेलचेल असल्यामुळे वारकर्‍यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत होते.

अश्वांची पूजा झाल्यानंतर वारकर्‍यांनी दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला प्रदक्षिणा पूर्ण केल्या. स्वारीचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ युवराज तांबे आडगावकर यांचा मानाचा अश्व धावला आणि लाखो भाविकांनी ‘माउली। माउली॥’ नामाचा एकच जयघोष केला. या जयजयकारातच अश्वांनी नेत्रदीपक दौड करीत हा रिंगण सोहळा अनुपम केला.

सोहळ्यात संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे प्रशासक भाऊसाहेब गंभिरे, पालखी सोहळाप्रमुख थेटे, महंत
डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज, सागर महाराज दौंड, भगीरथ महाराज काळे, एकनाथ महाराज गोळेसर, जालिंदर महाराज दराडे यांनी रिंगण सोहळ्याचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलिसपाटील सुनील चांदोरे, योगेश केदार, प्रा. ई. के. भाबड, माजी सरपंच लहानू भाबड, अनिल आव्हाड, संजय चांदोरे, रघुनाथ शेळके, वाल्मीक शेळके आदींसह ग्रामस्थांनी कंबर कसली.

रिंगण सोहळ्यासाठी निफाडचे विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, दशरथ चौधरी, सपोनि सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक, सिन्नर, एमआयडीसी आणि वावी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

मानाचे अश्व, पाठोपाठ नाथांचा रथ…
मानाचे अश्व दुपारी चार वाजता हजारो वारकर्‍यांसह दातलीनगरीत पोहोचले. सरंपच हेमंत भाबड व ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. पाठोपाठ नाथांचा रथ पोहोचला. हजारो वारकर्‍यांच्या साक्षीने पूजा व आरती झाली. लक्ष्मण रामभाऊ शेळके व कैलास रामभाऊ शेळके या शेळके बंधूंच्या मालकीच्या साडेतीन एकर क्षेत्रावर आखीव रेखीव गोल रिंगणासाठी मैदान सुशोभित करण्यात आले होते. रिंगणाच्या मध्यभागी समर्थ आर्टस् भगूर यांनी नेत्रदीपक रांगोळी काढली होती. तर अश्वांच्या रिंगणाच्या मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. निवृत्तिनाथांची पादुका व मुकुट असलेली पालखी खांद्यावर घेऊन रिंगणात आणण्यात आली. देव रिंगण, टाळकरी रिंगण, विणेकरी रिंगण झाले.

अधिकार्‍यांच्या सौभाग्यवतींनी धरला फुगडीचा फेर
यंदाच्या पालखी सोहळ्यात तहसीलदार राहुल कोताडे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे व नायब तहसीलदार सागर मुंदडा यांच्या सौभाग्यवतींनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ तर घेतलाच त्याबरोबरीने डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग नोंदवला. तसेच फुगडीचा फेर धरून आनंद द्विगुणित केला. फुगडी खेळताना वृषाली कोताडे, कविता मुटकुळे, तृप्ती मुंदडा सहभागी झाल्या.

हेही वाचा :

Back to top button