नाशिक : कामचुकार कर्मचार्‍यांना मनपा आयुक्तांचा दणका, दिले ‘हे’ आदेश

नाशिक : कामचुकार कर्मचार्‍यांना मनपा आयुक्तांचा दणका, दिले ‘हे’ आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चहापाण्याच्या नावाखाली कार्यालय सोडून बाहेर तासन्तास भटकणार्‍या आणि टाइमपास करणार्‍या कामचुकार कर्मचार्‍यांना महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी इशारा देत कार्यालयीन कारणाशिवाय बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. यासंदर्भात आयुक्तांनी आदेश जारी केले असून, उल्लंघन करणार्‍या कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनासह सहाही विभागीय कार्यालयांमधील अनेक अधिकारी तसेच कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे. अनेक कर्मचारी तर नुसती स्वाक्षरी करून लगेचच चहापाण्याच्या नावाखाली बाहेर पडून गप्पा झोडत असतात. 'रामायण'समोर तसेच राका कॉलनी येथे तर मनपा कर्मचारी हमखास आढळून येतात. त्याचबरोबर अनेक जण जेवणाच्या नावाखाली दुपारी बाहेर पडून थेट सायंकाळीच कार्यालयात हजर होतात. अनेक जण वैयक्तिक कामासाठी कार्यालयाबाहेर पडतात. या सर्व बाबी समोर आल्याने आयुक्तांनी अशा कामचुकार कर्मचार्‍यांना दणका दिला आहे. शहरातील अनेक सामान्य नागरिक तसेच लोकप्रतिनिधी आपापल्या कामकाजासाठी मुख्यालयात तसेच विभागीय कार्यालयात येत असतात. त्यावेळी कर्मचारी व अधिकारी उपस्थित नसल्याने अनेक नागरिकांना आल्या पावली परत फिरावे लागते. याशिवाय कामकाजावर परिणाम होत असल्याने आयुक्तांनी परिपत्रक काढत जेवणासाठी वा चहा-नाश्त्यासाठी कार्यालयातून बाहेर पडणार्‍यास बंदी घातली आहे.

मनपा मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालये तसेच उपकार्यालये, करभरणा केंद्रात काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सकाळी कामावर हजर झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर जायचे असल्यास संबंधित खातेप्रमुखांची परवानगी घेणे बंधनकारक केले असून, हालचाल नोंदवहीत त्याची नोंद कर्मचार्‍यांना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news