एव्हरेस्ट सर केलेल्या कस्तुरी सावेकरचा परतीचा प्रवास खडतर, पैशाअभावी निघाली ७५ किमी पायी चालत | पुढारी

एव्हरेस्ट सर केलेल्या कस्तुरी सावेकरचा परतीचा प्रवास खडतर, पैशाअभावी निघाली ७५ किमी पायी चालत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : प्रतिकूल परिस्थितीत जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करणार्‍या कस्तुरी सावेकरचा परतीचा प्रवास खडतर बनला आहे. एव्हरेस्ट बेसकॅम्प ते लुक्ला-नेपाळ या हेलिकॉप्टरच्या प्रवासाकरिता पैसे नसल्याने सुमारे 75 कि.मी. अंतराचा प्रवास तीन दिवस चालत करावा लागणार आहे. यामुळे कस्तुरीच्या कुटुंबीयांना लेकीची काळजी वाटू लागली आहे.

जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर कस्तुरीने दि. 14 मे रोजी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून कोल्हापूरच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला. एव्हरेस्ट मोहिमेच्या काही दिवसांपूर्वी तिला अपचनाचा त्रास झाला होता. मात्र, याचा परिणाम होऊ न देता कस्तुरीने एव्हरेस्ट शिखर सर केले. इतकेच नव्हे तर जगातले चौथ्या क्रमांकाचे असणारे माऊंट लोत्स्हे शिखर (उंची 27940 फूट) सर करायचे होते. मात्र, पैशाअभावी कस्तुरीने परतीचा मार्ग धरला आहे. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपासून लुक्ला (नेपाळ) पर्यंतचा 75 कि.मी. प्रवासाकरिता हेलिकॉप्टरच्या प्रवासासाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च येणार असल्याने कस्तुरीने हा प्रवास पायी चालत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कस्तुरीला कोल्हापूरला पोहोचण्यासाठी आणखी 10-12 दिवसांचा अवधी लागणार आहे.

समाजाकडून मदतीची अपेक्षा
एव्हरेस्ट मोहिमेसाठी कस्तुरीला सुमारे 49 लाख रुपये इतका खर्च झाला आहे. पैकी 28 लाख 56 हजार 700 रुपये इतकी रक्कम समाजातील दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था, संघटनांकडून मिळाली आहे. उर्वरित रकमेसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे समाजाकडून मदतीची अपेक्षा कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी केली आहे.

Back to top button