नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॉवर सबस्टेशन समोर ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व्ह निघाल्याने मोठा आवाज झाला. त्या आवाजामुळे जिल्हा रुग्णालयात काही वेळ घबराट पसरली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. योगायोगाने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील प्राणवायू गळतीच्या घटनेस गुरुवारी (दि.21) वर्ष पूर्ण होत असल्याने सिव्हिलमधील या ताज्या प्रकाराचीही चर्चा झाली.
जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या नेत्रशल्य विभागासमोरील विद्युत सबस्टेशनच्या समोरून जिल्हा रुग्णालयाला आवश्यक ऑक्सिजन व नायट्रोजन पुरवठा केला जातो. सुरक्षिततेसाठी या टाक्या बाहेरील शेडमध्येच लोड केल्या जातात. बुधवारी (दि.20) दुपारच्या सुमारास या ठिकाणी भरलेल्या टाक्या बसविण्याचे काम सुरू होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाहनातून या टाक्या खाली उतरविल्या जात असताना टाकी जमिनीवर आदळली. त्यामुळे एका टाकीच्या व्हॉल्व्हला धक्का बसल्याने प्रेशरमुळे टाकीतील वायू बाहेर येऊन टाकी वेगाने भितींवर आदळली. आवाजामुळे कर्मचार्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र काही वेळेतच आवाज बंद झाल्याने व नेमके काय झाले ही माहिती समजल्याने घबराट ओसरली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाकी लोड करण्यासाठी ज्या खासगी कर्मचार्यांवर जबाबदारी आहे, ते काळजी पुर्वक टाकी उतरवत नसल्याने हा प्रकार झाल्याचे समजते.