अतिपाणी प्यायल्यानेही निर्माण होतात ‘या’ समस्या

अतिपाणी प्यायल्यानेही निर्माण होतात ‘या’ समस्या
Published on
Updated on

शरीरातील सर्व पेशी आणि अवयव योग्य पद्धतीने कार्यरत राहावेत, पचनक्रिया सुरळीत चालावी, रक्ताभिसरण सुयोग्य पद्धतीने व्हावे यासाठी पाण्याची गरज असते. साधारणतः दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्रत्येकाने प्यायला हवेे; परंतु हल्ली भरपूर पाणी प्या, असे सातत्याने सांगितले जाऊ लागल्याने अनेक जण शरीराच्या गरजेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात पाणी पिताना आढळतात; पण त्यामुळे आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात.

अतिपाण्याचे सेवन करण्यास ओव्हरहायड्रेशन म्हटले जाते. अतिपाणी पिणे हा एक मानसिक रोगही आहे. त्यामध्ये व्यक्ती विनाकारणच जास्त पाणी पिते. त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होत असतो. प्यायलेले पाणी शरीरातून बाहेर पडू शकले नाही तर त्याचा मूत्रपिंडावर ताण येतो.

अतिपाणी प्यायल्यास शरीरात मीठ आणि इलेक्ट्रोलाईटचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे वॉटर इन्टॉक्सिकेशन नावाचा विकार जडू शकतो.

जास्त पाणी प्यायल्याने पोट फुगते. तसेच सतत उलटीही होते. त्यामुळे डोके जड होणे, दुखणे आदी त्रास उद्भवू शकतात. स्थिती अधिक बिघडल्यास रुग्ण बेशुद्ध पडू शकतो किंवा कोमातही जाऊ शकतो.

याखेरीज अतिपाणी प्यायल्याने मूत्रपिंडावर ताण येऊन त्याचे कार्य बंद होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांची अशी स्थिती झाल्यास परिस्थिती
अधिक धोकादायक होऊ शकते.

गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास महिलांमध्ये हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. रक्तदाब वाढू शकतो. श्वसनास त्रास होऊ शकतो. स्नायू आखडतात किंवा त्यात काठिण्य येते.

ज्येष्ठ नागरिकांनाही अतिपाणी प्यायल्यास त्रास होतो, त्यांना सतत लघवीला जावे लागू शकते.

काय करावे?

शरीरात जेव्हा पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा शरीर पाण्याची मागणी करते. त्यामुळे गरज नसेल तर पाणी पिऊ नये. ज्या व्यक्ती खूप व्यायाम करतात, त्यांना तसेच खेळाडूंना जास्त पाणी पिण्याची गरज भासते. अशा लोकांनीही साधे पाणी भरपूर पिण्याऐवजी सरबत, नारळपाणी, ज्यूस यांसारखी पेये सेवन करावीत.

डॉक्टरांचा सल्ला

अतिपाणी प्यायल्याने रुग्ण जर बेशुद्ध पडत असेल किंवा त्याच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागला असेल तर त्वरित डॉक्टरकडे जावे. जेवल्यानंतर लगेचच खूप जास्त पाणी प्यायल्यास पचनक्रियेत गडबड होते. बहुतांश वेळा शरीरातील पाण्याची पातळी आपोआपच कमी होते; परंतु तसे न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे जरूर घ्यावीत. रुग्णाची स्थिती खूपच गंभीर असेल तर शरीरातील अतिरिक्त पाणी काढण्यासाठी डायलिसिसही करावे लागते. सामान्यतः, व्यक्तीच्या वजनानुसार दिवसभरात किती पाणी प्यायला हवे, हे ठरवले जाते. थोडक्यात, शरीराची हाक ऐका, त्याप्रमाणे आहार आणि जलपान असावे.

डॉ. संतोष काळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news