

नंदुरबार , पुढारी वृत्तसेवा: जातीय दंगलीसारखे गंभीर गुन्हे घडविणाऱ्या नंदुरबार शहरातील एका टोळीतील १६ जणांना हद्दपार करण्याची कारवाई नंदुरबारचे नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केली आहे. शहरातील एकाचवेळी १६ जणांना २ वर्षांसाठी हद्दपार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नंदुरबार हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवून जातीय दंगली घडल्या होत्या. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विभिन्न जाती- जमातीतील काही समाज कंटकांचा समावेश होता. यामुळे नंदुरबार जिल्हा शांत ठेवण्यासाठी अशा समाज कंटकांवर अंकुश ठेवणे आवश्यक होते. नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच गुन्हेगारांवर वचक रहावा याकरीता नंदुरबार जिल्ह्यातील एका गुन्हेगारी टोळीतील एकूण १६ जणांना पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी हद्दपार केले. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ च्या अधिकारान्वये ही कारवाई केल्याचे जिल्हा पोलीस मुख्यालयाने कळविले आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारल्यापासून क्रमाने अशा धडक कारवाया सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणाऱ्या व्यक्तीची माहिती घेवून त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला जात आहे.
यात नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील काही आरोपींवर बेकायदेशीररीत्या टोळी निर्माण करुन शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून जाळपोळ करणे, जातीय तेढ निर्माण करणे, जातीय दंगल घडवून आणणे इत्यादी कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे त्यांना आढळले. दरम्यान, नंदुरबार शहर हद्दीत राहणाऱ्या एका टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला होता. म्हणून त्यांनी लगेच अशा आरोपींवर कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले व योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून १६ व्यक्तींना हद्दपार करण्याचे आदेश दिले.
नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केलेल्यांची नावे गोविंद यशवंत सामुद्रे (वय ३०, टोळी प्रमुख, रा. सिध्दार्थ नगर नंदुरबार), गोपी यशवंत सामुद्रे (वय ३३, रा. सिध्दार्थ नगर नंदुरबार), आकाश रविंद्र अहिरे ( वय २७, रा. आंबेडकर नगर नंदुरबार), विश्वजीत ऊर्फ बॉबी संजय बैसाणे ( वय २५, रा. समता कॉलनी नंदुरबार), गौतम मंगलसिंग खैरनार ( वय २७, रा. जुनी पोलीस लाईन नंदुरबार), भटु गोरख जाधव (वय २४, रा. मेहतर वस्ती नंदुरबार), शेखर रमेश जाधव (वय २५, रा. मेहतर वस्ती नंदुरबार), दिपक शामा ठाकरे (वय २२, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार) , मुकेश मधुकर ठाकरे (वय २५, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार), अक्षय अनिल वळवी ( वय २२, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार) , वंकर रतिलाल ठाकरे (वय २६, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार), शंकर रतन ठाकरे (वय २५, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार), सतिष ऊर्फ जिबला दिलीप वळवी (वय २०, रा. चिंचपाडा मिलाटी, नंदुरबार), सचिन शामा ठाकरे (वय २२, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार ), राकेश राजेश ठाकरे (वय २६, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार) आणि अंबालाल जयसिंग ठाकरे (वय २२ रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार) अशी त्याची नावे आहेत.
हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असून हद्दपार व्यक्तींनी आदेश प्राप्त झाल्यावर ४८ तासाच्या आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघून जाणेबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच हद्दपार व्यक्तींनी यापुढे नंदुरबार जिल्ह्यात येताना पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांची तसेच न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक राहिल. हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास प्रचंलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वरील १६ हद्दपार व्यक्ती नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसून आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे कळवावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?