धुळ्यातील दुस-या खासगी सावकाराच्या लॉकरमधून १० कोटी ७३ लाखांचे घबाड जप्त

File Photo
File Photo

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात खाजगी सावकारी करणाऱ्या विमा एजंट राजेंद्र बंब याच्या शिरपूर सहकारी बँकेच्या लॉकरमधून शुक्रवारी (दि.३) तब्बल १० कोटी ७३ लाख रुपयांचे धबाड जप्त करण्यात आले. तर शनिवारी योगेश्वर पतसंस्थेमध्ये असणाऱ्या लॉकरची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धुळ्यात विमा एजंटचे काम करणारा राजेंद्र बंब यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बंब यांच्या घरातून आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरातून मोठी रक्कम दागिने आणि संशयित कागदपत्रे जप्त केली. यानंतर गुरूवारी (दि.२) जळगाव जनता सहकारी बँकेत असणारे लॉकर उघडण्यात आले. या लॉकरमधून तब्बल २ कोटी ५४ लाखांची रोकड आढळून आली. तर १९ लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. या पाठोपाठ शुक्रवारी सकाळी उपविभागीय अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक, उपनिबंधक व त्यांच्या पथकाने शिरपूर सहकारी बँकेचे लॉकर उघडले.

या लॉकरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड आणि दागिने आढळून आले. शुक्रवारी सायंकाळी ६ च्या दरम्‍यान लॉकरमधील वस्तूंची तपासणी करून जप्तीची कार्यवाही करण्यात आली. या लॉकरमध्ये १२ सौदा पावत्या, पाच मूळ खरेदीखत, कर्जदाराच्या स्वाक्षऱ्या असलेले २४ कोरे चेक, ५० कोरे स्टॅम्प तसेच जीपी फायनान्स नावाने छपाई असलेले ५० सेट, ११ चेक बुक तसेच विविध नोंदी असणाऱ्या तीन डायर्‍या आणि दोन मोठ्या खतावण्या आढळून आल्या. याच लॉकरमध्ये पाच कोटी १३ लाख ४४ हजार ५३० रुपयांची रोकड आढळली. तसेच  सात किलो ६३१ ग्रॅम चांदी आढळून आले आहे. या चांदीची किंमत ५ लाख १४ हजार ९११ रुपये इतकी असून या लॉकरमध्ये १० किलो ५६३ ग्रॅम सोने आढळले. या सोन्याची किंमत सुमारे ५ कोटी ५४ लाख रुपये इतकी आहे. यात सोन्याचे ६७ लहान तर एक मोठे बिस्किट ठेवले होते. याशिवाय वेगवेगळ्या कर्जदारांकडून घेतलेले तीन किलो ५७९ ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले असून या दागिन्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींची नावे लिहिण्यात आली आहेत.

या कारवाईमध्ये तब्बल १० कोटी ७४ लाख रुपये किंमतीचे ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि शनिवारी योगेश्वर पतसंस्थेत असणारे लॉकर उघडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या तीनही लॉकरची चौकशी बंब यांच्याकडे पोलिसांनी करून देखील बंब यांनी या लॉकरच्या चाव्या पोलिसांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सहकार विभागाची मदत घेऊन संबंधित बँकेच्या व्यवस्थापनाकडून या लॉकरची तपासणी करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर घबाड जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news