नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी ; साकिनाका प्रकरणाचा निकाल | पुढारी

नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी ; साकिनाका प्रकरणाचा निकाल

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : साकिनाका येथील एका महिलेवर लैगिंक अत्याचार करुन तिच्या हत्येप्रकरणी मोहन कथवारु चौहाण याला गुरुवारी दिडोंशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाच तीन वर्षांपूर्वी विलेपार्ले येथून अपहरण झालेल्या एका नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करुन तिची हत्या केल्यानंतर तिच्या हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिवेल ऊर्फ गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्र या 33 वर्षांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शुक्रवारी दिडोंशीतील सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

दोन दिवसांत दोन आरोपींना दिडोंशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याची ही आतापर्यंतची पहिलीच घटना आहे. तिसरीमध्ये शिकणारी पिडीत मुलगी विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरात तिच्या आई-वडिल आणि पाच वर्षांच्या भावासोबत राहत होती. 4 एप्रिल 2019 रोजी ती दुकानातून चहापत्ती आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊन ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांसह स्थानिक रहिवाशांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी तिच्या मिसिंगची तक्रार जुहू पोलिसांत केली होती.

अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच दुसर्‍या दिवशी वडिवेल देवेंद्र या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्यानेच या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिची हत्या करुन मृतदेह जवळच्या सार्वजनिक शौचालयात टाकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

Back to top button