पिंपळनेर : कासारे येथे अवैध गुटखा विक्रेत्याकडून १ लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

पिंपळनेर : कासारे येथे अवैध गुटखा विक्रेत्याकडून १ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील कासारे गावात बसस्थानक परिसरातील एका गाळ्यातून अवैध गुटखा साठवून ठेवल्याची माहिती मिळताच पोनि दिनेश आहेर यांनी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ लाख ७० हजार रूपये किंमतीचा गुटखा साक्री पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयित सागर बागूल या तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, पो. नि. दिनेश आहेर यांना मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास कासारे बसस्टॅण्डमध्ये एका तरूणाने गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पो. नि. आहेर याच्या मार्गदर्शानाखाली पोसई बी. बी. नन्हे यांना कारवाईचे आदेश दिले. यानंतर हे. कॉ. आर. बी. अहिरे, पो. ना. एस. एम. साबळे,पो. कॉ. शांतीलाल पाटील यांच्यासह दोन पंचासोबत कासारे येथे जावून छापा टाकला.

यावेळी पोलिसांनी संशयित तरुणाना ताब्यात घेत तेथील गाळ्यात शोधमोहिम राबविली. याच दरम्यान १ लाख ३६ हजार २०० रूपये किंमतीचा विमल गुटखा व ३३ हजार रूपये किंमतीची व्ही-१ तंबाखू असा एकूण १ लाख ६९ हजार २०० रूपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला. यानंतर संशयित तरुणाने आपले नाव सागर बागूल असल्याचे कबूल केले.

याप्रकरणी पो. कॉ. शांतीलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button